

NCP Vs BJP : आमच्या पक्षाचा महापौर असताना देशातील ‘बेस्ट सिटी’ म्हणून पिंपरी चिंचवडला पुरस्कार मिळाला होता. रस्ते, उद्यान, उड्डाणपूल आदी कामे आमच्या काळात झाली आहेत. शहराच्या विकासासाठी जीवाचे रान करत होतो. मी बारकाईने लक्ष देत होतो. आता काय स्थिती आहे. सर्व कामांमध्ये ‘रिंग’ सुरू आहे. ठराविक लोकांनाच काम दिले जात आहेत. निविदांवर पैसे उधळले जात आहे. जॅकवेलच्या कामात 30 टक्के वाढ झाली, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कारभाराचे जाहीरपणे वाभाडे काढले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी तळवडे आणि चिखली येथे जाहीर विजय संकल्प सभा आयोजित केली होती. यावेळी पवार बोलत होते. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, अजित गव्हाणे, कविता आल्हाट आदी उपस्थित होते. एका बाजूला उमेदवारी जाहीर करण्याच्या सर्वच पक्षांत चर्चा सुरू असताना दुसऱ्या बाजूला पवार यांनी नारळ फोडून प्रचारात आघाडी घेतली आहे.
अजित पवार म्हणाले, पवार म्हणाले, ‘‘मी पंचवीस वर्षांत कधीही फोडाफोडीचे राजकारण केले नाही. ज्याला स्वखुशीने यायचे या. आज हे काय चाललंय? फोडाफोडी करून दम दिला जातोय. पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी हे खपवून घेता कामा नये. पिंपरी चिंचवड शहराचा विकास करत असताना 25 वर्षांत कधीही कर्ज काढले नव्हते. केंद्राचा पैसे आणला, त्याला जोड राज्याची होती. आज महापालिकेवर हजारो कोटींचे कर्ज आहे. महापालिका कर्जबाजारी केली, हे पाप कुणाचं? असा सवालही त्यांनी विचारला.
शहराची वाटणी निगडी-दापोडी रस्त्याने :
‘‘5 वर्षांच्या काळात निगडी ते दापोडी रस्त्याच्या पलीकडे तू बघ आणि रस्त्याच्या अलीकडे मी बघतो. सगळे यांनीच वाटून घ्यायचे. आता त्यांच्यात वाद सुरू आहेत. त्यांची पूर्वीची परिस्थिती काय होती? आज एवढा पैसा कुठून आला? प्रॉपर्टी कशा वाढल्या? बाकीचे लोक कष्ट करत नाहीत का? हे सर्व तुम्ही बघता आहात, ’’ याचा विचारही तुम्ही केला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
शहरात टँकरमाफिया फोफावले :
‘‘शहरामध्ये काही लोकांनी जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लोकांना रस्त्यावर उतरावे लागले. मग ‘डीपी’ रद्द करावा लागला. वाळूमाफिया, ड्रग्समाफिया यांसारखे आता शहरात टँकरमाफिया झाले आहेत. मूठभर लोकांचे दुकान चालविण्यासाठी सोसायट्यांना पाणी देत नाहीत. शहरात टँकरमाफिया फोफावले आहेत, ’’ अशीही टीका पवार यांनी केली.
संतपीठ नावालाच!
‘‘हा महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचा आहे. संतपीठ सुरू करण्याचा निर्णय आमच्या कार्यकाळात झाला होता. तेथून प्रवचनकार, कीर्तनकार निर्माण झाले पाहिजे. तबलावादक, हार्मोनियमवादक घडवायचे होते. भागवत, ज्ञानेश्वरी यांचे शिक्षण देणे अपेक्षित आहे; पण तिथे सीबीएसई शाळा सुरू आहे. त्यामुळे संतपीठ नावालाच असल्याचे दिसून येते, ’’ अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.
दादागिरीला बळी पडू नका :
‘‘शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. नेते मंडळीच्या बैठकीमध्ये जागावाटप करत असताना व्यवस्थित नियोजन केले आहे. दोन दिवसांत सगळ्यांना सगळे समजेल. दोन दिवस कळ काढा. त्यामुळे कोणाच्याही भूलथापा आणि दादागिरीला बळी पडू नका, ’’ असे आवाहन पवार यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.