भोसरीच्या रेडी रेकनर दरावरून आमदार लांडगेंची झाली पंचाईत; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

Mahesh Landge|Ajit Gavane|NCP|BJP|PCMC : निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी भाजपविरुद्ध प्रचंड आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या हाती रेडी रेकनरने आयतेच कोलित दिले आहे.
Ajit Gavhane, Mahesh Landge News
Ajit Gavhane, Mahesh Landge News sarkarnama

पिंपरी : राज्यातील रेडी रेकनरचे दर नुकतेच जाहीर झाले. ज्या भागात सर्वाधिक विकास होतो त्या भागामध्ये रेडीरेकनरचा दर हा अधिक असतो. पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात भोसरी विधानसभेत हा दर चिंचवडच्या तुलनेत खूप कमी आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) भाजपवर (BJP) पुन्हा हल्लाबोल केला. गेल्या पाच वर्षात भोसरीचा विकास किती मागासलेला आहे हेच सिद्ध होत असून भोसरी व्हिजन 2020 चे गाजर दिवाळखोरीत निघाले असल्याची सडकून टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavane) यांनी भाजपचे शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगेंवर (Mahesh Landge) केली आहे. सर्वात कमी दर हा भोसरीत असावा हे भाजपवर विश्वास दाखविणाऱ्या नागरिकांचे दुर्देव म्हणावे लागेल,असे ते म्हणाले. (Mahesh Landge News)

Ajit Gavhane, Mahesh Landge News
कोरोनातील स्पर्श घोटाळ्यामुळे पिंपरी महापालिका अडचणीत

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी पालिकेतील मावळते सत्ताधारी भाजपविरुद्ध काही दिवसांपासून प्रचंड आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या हाती रेडी रेकनरने आयतेच कोलित दिले. त्यामुळे पालिकेतील मोठ्या भ्रष्टाचारानंतर त्यांनी भाजपला पुन्हा लक्ष्य केलं. शहराचे दुसरे कारभारी भाजपचे माजी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या चिंचवड मतदारसंघातील निवासी दर हा भोसरीपेक्षा अधिक असल्याचे सांगत गव्हाणे यांच्या निशाण्यावर जगतापांपेक्षा आमदार लांडगेच अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. चिंचवडमधील वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख परिसरात निवासी दर हा 4,900 ते 9,200 रुपये प्रति चौरस फुट, तर तोच भोसरीत मोशी, तळवडे, चिखलीमध्ये 3,900 ते 6,000 हजार रुपये असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. याव्दारे भोसरी मतदारसंघात विविध विकासकामे केल्याच्या लांडगे आणि भाजपच्या दाव्याची पोलखोल रेडी रेकनर दरानेच केल्याचे गव्हाणे म्हणाले.

विकासाच्या नावाखाली केवळ गाजरे दाखविण्याचे काम करणाऱ्या आमदारांच्या मनमानी आणि निष्क्रीय कारभारामुळे भोसरीचा विकास म्हणजे पाण्यावरचे बुडबुडेच ठरल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. गेल्या पाच वर्षांत शहरात किती असमान विकास झाला हे देखील रे़कनरमधून समोर आले, अशी तोफ त्यांनी भाजप राजवटीवर डागली.

Ajit Gavhane, Mahesh Landge News
अजित पवारांचा राज ठाकरेंना सवाल : एवढे दिवस काय झोपा काढल्या काय?

लांडगे हे महापालिकेचे कारभारी होते. भोसरीतील मतदारांनी अत्यंत विश्वासाने त्यांना दोनवेळा विधानसभेत पाठविले, मात्र त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना केवळ विकासाची स्वप्ने दाखविली. मोठा गाजावाजा केलेले भोसरी व्हिजन 2020 हे केवळ गाजरच ठरले. आता, तर ते दिवाळखोरीत निघाल्याचे रेडीरेकनच्या दरावरून स्पष्ट झाले आहे, अशी टीका गव्हाणेंनी केली. राष्ट्रवादीने पालिकेत सत्ता असताना शहराचा समान विकास करण्यावर भर दिला. मात्र भाजपची सत्ता आल्यानंतर भाजप कारभाऱ्यांनी सर्वाधिक दुर्लक्ष हे भोसरीच्या गावांकडे केले. त्यामुळे भोसरी, चऱ्होली, तळवडे, चिखली, मोशी ही गावे विकासापासून दूरच राहिल्याचे रेडीरेकनरने स्पष्ट केले. प्राधिकरणाने विकसीत केलेला इंद्रायणीनगरचा परिसर वगळता गेल्या पाच वर्षांत भोसरीत सत्तेच्या आडून भाजप नेत्यांनी निर्माण केलेल्या दहशतीमुळे विकासकामे अपेक्षित वेगाने झाली नाहीत. कोणत्याही नामांकित इंडस्ट्रीची नव्याने पायाभरणी झाली नाही. एकही नवा व्यवसाय नावारुपाला आलेला नाही. सत्तेच्या आडून निर्माण करण्यात आलेल्या दहशतीमुळे भोसरी विधानसभेतील गावे आजही विकासापासून वंचित राहिली. त्याला आमदार हेच जबाबदार आहेत.

Ajit Gavhane, Mahesh Landge News
दिल्लीत मोठी घडामोड : पंतप्रधान मोदी अन् शरद पवारांच्या भेटीनं चर्चांना उधाण

2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये व्हिजन 2020 चे स्वप्न त्यांनी भोसरीकरांना दाखविले. त्या व्हिजनचे काय झाले हे बोलण्याची धमक आमदारांमध्ये राहिलेली नाही. रोज नविन गाजरे दाखवायची आणि त्यातून स्वत:चा स्वार्थ साधायचा हा एकमेव उपक्रम या महाशयांकडून सुरू आहे. भोसरीला विकासापासून दूर ठेवण्याचे पाप करणाऱ्या भाजपला आणि आमदारांना भोसरीतील जनता कदापी माफ करणार नसून येत्या महापालिका निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवेल, असा दावा गव्हाणे यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com