Pune News: उपमुख्यमंत्री अजित पवार आज खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. या मेळाव्याला मात्र माजी खासदार आणि सध्याचे राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील मात्र अनुपस्थित होते. त्यांची ही अनुपस्थिती सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आल्यानंतर आवर्जून उपस्थित राहणारे आढळराव पाटील अजित पवारांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवत असल्याने ते पुन्हा शिवसेनावासी होण्याच्या तयारीत आहेत का? अशा चर्चा रंगल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे यांची 'तुतारी' वाजल्याने आढळरावांना सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी मनापासून काम केलं नसल्याचे खंत आढळराव पाटील यांनी यापूर्वी अनेक जणांना खाजगीत बोलून दाखवली असल्याचं सांगण्यात येतं.
लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामधून आढळराव पाटील हे शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र महायुतीच्या जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटल्याने ऐन निवडणुकीपूर्वी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांमध्ये पक्ष प्रवेश करावा लागला.
2019च्या निवडणुकीप्रमाणेच या लोकसभा निवडणुकीत देखील आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे हे समोरासमोर उभे ठाकले होते. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, असे वाटत होतं. मात्र तब्बल 1 लाख 40 हजार मतांनी आढळराव पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर सातत्याने आढळराव पाटील यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांच्याशी जास्त जवळीक पाहायला मिळाली आहे.
आज पुण्यातील खेड-आळंदी विधानसभेत अजित पवार यांचा दिवसभर दौरा सुरु आहे. पण आढळराव मात्र कुठंही दिसून आलेले नाहीत. हेच आढळराव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभा मतदारसंघात आल्यावर आवर्जून उपस्थित राहतात.
मुख्यमंत्री भीमाशंकर दर्शनाला आले तेव्हा अन आळंदीत वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला सर्वात आधी आढळराव उपस्थित होते. लोकसभेपुर्वी राष्ट्रवादीत आलेले आढळराव अलीकडे अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदेंशी अधिकची जवळीक साधतायेत. त्यामुळंच अजित पवार शिरूर लोकसभेत आले की आढळरावांच्या अनुपस्थितीची चर्चा नेहमीच रंगते. या राजकीय घडामोडींकडे पाहता आढळराव पुन्हा शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता ही वर्तवली जातेय.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.