Pune News: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मुख्यमंत्री होण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या होत्या. त्या संदर्भात खुलासा करताना डॉ.कोल्हे म्हणाले की, "ते विधान अजित पवार की जयंत पाटील असे तुलनात्मक पातळीवर नव्हते. त्यामागे स्थानिक संदर्भ होते", असा खुलासा त्यांनी आता केला आहे.
अजित पवार यांच्यामुळेच आपण खासदार होऊ शकलो, असं म्हणत त्यांनी अजित पवार यांचे तोंडभरून कौतुक केले. पिंपरी-चिंचवडमध्ये एका फाउंडेशनने घेतलेल्या मुलाखतीत खासदार अमोल कोल्हे बोलत होते.
अमोल कोल्हे म्हणाले, "अजित पवार यांच्यामुळेच आपण खासदार होऊ शकलो. पक्षप्रवेश, उमेदवारी या गोष्टी त्यांनी मोठ्या साहेबांच्या माध्यमातून करवून घेतल्या. अजितदादांचे पुत्र मावळ लोकसभा निवडणूक लढवत असतानाही तितकेच लक्ष त्यांनी शिरूरमध्ये दिले. त्यामुळेच अवघ्या २२ दिवसांच्या प्रचारात निवडणूक जिंकणे शक्य झाले", असं गौरोद्गार त्यांनी काढले.
"लोकप्रिय चेहरा असला तरी अजितदादांचे भक्कम पाठबळ लाभले म्हणूच निवडणूक जिंकता आली, असेही त्यांनी कबूल केले. वढू, तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी जीर्णोद्धारासाठी २५० कोटी रुपये उपलब्ध करून देणारे अजितदादा हे पहिले राजकीय नेते आहेत", असेही प्रशंसोद्गार त्यांनी काढले.
याबरोबरच त्यांनी मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही, या विषयावर भाष्य केलं. थिएटर आणि शो मिळत नाही म्हणून टीडीएम या मराठी चित्रपटातील कलावंतांना अश्रू अनावर झाले, अशी वेळ येणे, ही दुर्देवी गोष्ट आहे. शाहीर साबळे यांच्या जीवनावरील हा चित्रपट चांगल्याप्रकारे सुरू असताना, 'द केरला स्टोरी' हा सिनेमा विनामूल्य दाखवला जात आहे, हे चुकीचे आहे, असे मत अमोल कोल्हे यांनी यावेळी मांडले.
(Edited By- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.