पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) नियोजन समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीचे आठही उमेदवार विजयी झाल्याचा विजयोत्सव दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते, सर्व विजयी उमेदवारांनी महापालिका भवनासमोर साजरा केला.आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल उत्साह दुणावणारा आहे. महापालिकेतील आगामी विजयाची नांदी आहे,असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीकडून पुण्यातून नगरसेवक सचिन दोडके, बाबूराव चांदेरे, वैशाली बनकर, दिलीप बराटे तसेच पिंपरीतून नगरसेविका वैशाली घोडेकर, अजित गव्हाणे, मोरेश्वर भोंडवे तसेच शिवसेनेचे अविनाश साळवे हे आठजण नियोजन समितीवर निवडून आले आहेत.
जगताप म्हणाले, ‘‘ पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील संख्याबळानुसार नियोजन समितीच्या एकूण २२ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे सात व शिवसेनेचा एक असे आघाडीचे आठही उमेदवार विजयी झाले आहेत, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी झालेली ही ‘पीएमआरडीए’ नियोजन समितीची निवडणूक महत्त्वपूर्ण होती. त्यामुळे, राज्यात एकत्रित सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जावे, अशी भावना पक्षाचे वरिष्ठ नेते, नगरसेवक व कार्यकर्त्यांची होती. काँग्रेसचे संख्याबळ पाहता एकही उमेदवार विजयी होणार नसल्याचे निश्चित होते. त्यामुळे, काँग्रेसने उमेदवार उभा करू नये, अर्ज माघारी घ्यावा, यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह आम्हीही आग्रही विनंती करीत होतो. मात्र, शहर पातळीवरील काही नेतेमंडळीनी आघाडीत बिघाडी होण्याचीच भूमिका घेतल्याने अखेर निवडणुकीला सामोरे जावे लागले.’’
आगामी पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल निश्चित आमचा उत्साह दुणावणारा आहे. तसेच, हा निकाल आगामी निवडणुकीतील विजयाची नांदी आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमीलन या निवडणुकीच्या निकालात दिसून आले असून, आगामी काळातही ते दिसून येईल, यात काही शंका नाही, असे जगताप यांनी स्पष्ट केले.
कार्यकर्ते, नगरसेवक यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून स्वत:चेच मत त्यांच्यावर लादणाऱ्या काँग्रेसच्या काही नेत्यांमुळे काँग्रेस या आघाडीचा भाग होऊ शकली नाही, याची निश्चितच खंत वाटते. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीचा विजयी जल्लोष सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसला आत्मचिंतन करावे लागत आहे, याचेही आम्हाला निश्चितच एक मित्रपक्ष म्हणून वाईट वाटते. परंतु, या निकालाने राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार शहर पातळीवरील नेत्यांनी, नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी जी एकी दाखवून दिली, ती निश्चितच यापुढेही यशस्वी, विजयी वाटचालीची ठरेल, यात काही शंका नाही, असे जगताप यांनी सांगितले.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.