Pandharpur Politics : अत्यंत चुरशीने झालेल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी कल्याणराव काळे यांनी आपली काखान्यावरील २२ वर्षांची सत्ता कायम राखली. मात्र, विरोधी अभिजीत पाटील पॅनेलच्या उमेदवारांना मिळालेली मत ही सत्ताधारी काळे गटाला आत्मचिंतन करायाला लावणारी आहेत. सरासरी १७०० मतांच्या फरकांनी काळे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. (Votes received by Abhijeet Patil group Self-reflection for kale-Bhalke group)
सहकार शिरोमणी साखर कारखान्यावर (Sugar Factory Election) कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांचे स्थापनेपासून वर्चस्व आहे. कारखान्याचे संस्थापक (कै.) वसंतराव काळे यांच्यानंतर त्यांचे पुत्र कल्याणराव काळे हे गेल्या २२ वर्षांपासून कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. गेल्या २२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची आणि चुरशीची झाली.
सुमारे दहा महिन्यापूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अभिजीत पाटील यांनी बाजी मारली. दोन वर्षे बंद पडलेला विठ्ठल सहकरी साखर कारखाना चालू केला. शिवाय थकीत ऊस बिलाचाही प्रश्न सोडवला. त्यामुळे नेहमीच ऊस दराबाबत इतर कारखान्यांच्या तुलनेत मागे असलेल्या सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या निडणुकीत भाग घ्यावा, अशी कार्यकर्त्यांची व सभासदांची इच्छा होती. त्यानुसार अभिजीत पाटील यांनी सहकार शिरोमणी साखर कारखान्याची निवडणुक अत्यंत ताकदीने लढवली.
सुरुवातीला अभिजीत पाटील गट निवडणूक जिंकणार, अशीच हवा होती. त्यामुळे निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली होती. निवडणुक प्रचारादरम्यान दोन्ही गटाने आरोप प्रत्यारोप केले. ऐन निवडणुकीत भगीरथ भालके, युवराज पाटील, गणेश पाटील यांनी काळे यांना साथ दिल्यामुळे काळेंचे पारडे जड झाले होते. त्यानंतरही अभिजीत पाटील यांनी आपल्या मोजक्या शिलेदारांसह तालुक्यात प्रचाराचा धडाका उडवून दिला होता.
ऊसदारावरून खिंडीत पकडले; मात्र काळेंचीच बाजी
प्रचारात थकीत ऊस बिलाचा मुद्यावरुन सत्ताधारी काळे गटाला खिंडीत पकडले. बिल देणारा व साखर कारखाना चालवणारा माणूस अशी प्रतिमा तयार करण्यात पाटील यशस्वी झाले. आठ ते दहा दिवसांच्या प्रचारादरम्यान दोन्ही गटांनी साम दाम दंड या नितीचा वापर करुन निवडणूक लढवली. यामध्ये कल्याणराव काळे यांनी बाजी मारली. एकूण ९ हजार ६०० मतदारांपैकी काळे गटाच्या उमेदवारांना सरासरी ५४००, तर अभिजीत पाटील यांच्या उमेदवारांना सरासरी ३८०० इतकी मते मिळाली. काळे गटाचे उमेदवार १ हजार ६०० मतांच्या फरकांनी विजयी झाले.
काळेंचे पै-पाहुणे; तरीही पाटलांची मुसंडी
सहकार शिरोमणी साखर कारखान्यात अभिजीत पाटील यांच्या उमेदवारांना पडलेली मते काळे-भालके यांना आत्मचिंतन करायाला लावणारी आहेत. काळे यांच्या पै-पाहुणे आणि नाते गोत्यातील सभासद संख्या जास्त असतानाही पाटील गटाने मारलेली मुसंडी ही पाटील गटाच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारी आहे, तर काळे गटाला आत्मचिंतन करायाला लावणारी आहे.
विठ्ठलबरोबर ऊसदर देण्याचे आव्हान
कारखान्यावर सत्ता आल्यामुळे काळे यांना सभासद आणि कामगारांची थकीत ऊस बिले देण्यासाठी प्रथम प्राधान्य द्यावे लागणार आहे. शिवाय तोंडावर आलेल्या बैलपोळा सणासाठी शंभर रुपयांचा दुसरा हप्ताही जाहीर करावा लागणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने काळे गटाच्या कार्यकर्त्यांचा अपेक्षाही वाढल्या आहेत. त्यांच्या उपेक्षांची पूर्ताता करणे हे काळे यांच्या समोर आव्हान असणार आहे. शिवाय आगामी काळात कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून विठ्ठल कारखान्याबरोबर ऊसदर ही द्यावा लागणार आहे. शेवटी ऊस उत्पादक शेतकरी सभासद सजग झाला आहे, हे निवडणूक निकालाने दाखवून दिले आहे.
भालके-काळे-परिचारक युती
सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यात नवी राजकीय समीकरणे तयार झाली आहेत. त्यामध्ये भालके-काळे-परिचारक अशी नवी युती तयार झाली आहे. सहकार शिरोमणीच्या निवडणुकीमध्ये कल्याणराव काळे यांना भगीरथ भालके, युवराज पाटील, गणेश पाटील यांनी मदत केली. शिवाय भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीही काळे यांना मोठी मदत केली.
नवी युती विठ्ठल परिवाराच्या पचनी पडेल काय?
परिचारकांच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांसह त्यांच्या स्लीपबॅाय यांनी गावोगावी जाऊन सहकार शिरोमणीच्या सभासदांच्या गाठीभेटी घेवून काळे यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. परिचारकांनी सर्व ताकदीनिशी काळे यांना साथ दिल्यामुळे काळे गटाचा विजय सोपा झाल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. ही नवी युती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह विधानसभेच्या निवडणुकीतही दिसून येण्याची शक्यता आहे. ही नवी युती विठ्ठल परिवारांतील कार्यकर्त्यांना किती पचनी पडणार हे आगामी काळात दिसून येईल.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.