Pimpri News : लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार असल्याने दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यातच आता सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नसल्याने कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असणारा बारामती लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या निवडणूक लढविणार असून, त्यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात सतत नव्या घडामोडी पाहायला मिळत आहेत.
माजी मंत्री विजय शिवतारेंच्या आक्रमक भूमिकेमुळे बारामतीत तिहेरी लढत होणार असल्याची चर्चा आहे. विजय शिवतारेंकडून अजित पवार यांच्यावर आरोप केले जात असल्याने मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी विजय शिवतारेंना दम दिला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी येत्या काळात जर युतीचा धर्म पाळला नाही तर आम्ही पण मावळ लोकसभा निवडणुकीत युती धर्म पाळणार नाही, असा सज्जड इशारा पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी दिला आहे. त्यामुळे आता येत्या काळात नव्या वादाला तोंड फुटणार आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभा क्षेत्र येते. त्याशिवाय मावळ लोकसभा क्षेत्रात दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) आमदार आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीतील पार्थ पवार यांच्या पराभवाचा आणि आताच्या घडीचा काहीही संबंध नाही आहे. मात्र, विजय शिवतारे (Vijay Shivtare) जर असेच आमच्या नेत्याबद्दल बेताल वक्तव्य करत राहिले तर आम्ही आणि आमचे पदाधिकारी जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी दिला आहे.
R