वालचंदनगर (जि. पुणे) : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आग्रहानंतर छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजात सक्रीय झालेले कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांना आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संचालकांनी बैठकीला बसण्यास विरोध केला. पण, उपमुख्यमंत्री अजित पवार तसे सांगितले तरच मी बाहेर जाईन; अन्यथा नाही, असे म्हणत त्यांनी बैठकीतून बाहेर जाण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीतच बैठक झाली. (Opposition of NCP directors to Prithviraj Jachak sit in meeting of Chhatrapati Karkhana)
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांना शुक्रवारी (ता. ८ आक्टोबर) संचालक मंडळाच्या बैठकीतून काही संचालकांनी बाहेर जाण्यास सांगितल्याने संचालक मंडळ व जाचक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. छत्रपती सहकारी साखर कारखान्यातील काही संचालकांची दुकानदारी बंद केल्यामुळे मला संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये बसण्यास विरोध केला जात आहे, असा गंभीर आरोप जाचक यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.
जाचक यांनी सांगितले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने मी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीला दीड वर्षापासून उपस्थित राहत आहे. तसेच, मला कारखान्याने लेखी पत्र दिले होते. आजच्या बैठकीमध्ये काही संचालकांनी मला बसण्यास विरोध केला. मात्र, मी सभासदांच्या हितासाठी बैठकीला उपस्थित राहत आहे. अजितदादांनी मला बैठकीला बसू नका, असे सांगितल्यानंतर मी बैठकीला बसणार नाही. तसेच, कारखान्याच्या अध्यक्षांनी मला बैठकीतून बाहेर जाण्याचे पत्र द्यावे, तरच मी बाहेर जाईन, अशी भूमिका जाचक यांनी घेतली.
संचालक मंडळ २०२१-२२ गाळप हंगामातील रॉ-शुगर व मॉलेसेसची विक्री करण्याचा निर्णय घेत आहे. या निर्णयामुळे सभासदांचा तोटा होणार असून याला मी विरोध करणार आहे. तसेच, कारखान्याला उस पुरवठा न करणाऱ्या सभासदांना निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क देऊ नये. त्यांना वर्षाला ७५ किलो साखर वाटप करु नये, यामुळे कारखान्याचा व उस उत्पादक सभासदांचा पाच वर्षांत १५ कोटींचा तोटा होत असल्याचे सांगून संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये संचालक मंडळाच्या हो ला हो करण्यासाठी मी बैठकीला जात नसून सभासदांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी बैठकीला जात असल्याचे सांगितले.
रॉ-शुगर आणि मॉलेसेस विक्रीस जाचकांची सहमती : प्रशांत काटे
श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना अर्थिक अडचणीमधून जात आहे. सन २०२१-२२ च्या गळीत हंगाम सुरु करण्यासाठी ४० ते ४५ कोटी रुपयांची आवश्यकता असून रॉ-शुगर व मॉलेसेसची आगाऊ विक्री करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्या निर्णयाला कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांचीही सहमती असल्याची माहिती छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी दिली.
आज संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये जाचक यांनी बसण्यास विरोध झाल्यामुळे संचालक मंडळ व जाचक यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली. काटे यांनी सांगितले की, २०२१-२२ चा गळीत हंगाम सुरु करणे महत्वाचे आहे. यासाठी कारखान्याला ४० ते ४५ कोटी रुपयांची गरज आहे. सध्याच्या परस्थितीमध्ये मोठी रक्कम उभारणे अवघड असल्याने आगाऊ राॅ-शुगर व माॅलेसेस विक्रीचा निर्णय घेतला. यामुळे कारखान्याला एका पोत्यामागे सुमारे ५०० रुपये अॅडव्हास मिळणार आहे. तसेच, कारखान्याचे व्याज ही वाचणार असून कारखान्याचा व सभासदांचा फायदा होणार आहे.
जाचक यांना दीड वर्षापूर्वी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलाखतीच्या बैठकीला उपस्थिती राहण्याचे पत्र कारखान्याने दिले होते. सर्व संचालक मंडळाच्या सहमतीने ते दीड वर्ष बैठकीला उपस्थित होते. त्याला संचालक मंडळाचा विरोध नव्हता. मात्र, जाचक यांनी न्यायालयाच्या तारखेला उपस्थित राहत असल्याच्या व खर्चाच्या कारणावरुन काही संचालकांच्या विरोधात तक्रारी अर्ज दिल्याने १६ संचालकांनी शुक्रवारी (ता. ८ आक्टोबर) जाचक यांना बैठकीमध्ये बसण्यास विरोध केल्याचे पत्र दिले होते. कारखान्याचे २९ हजारापेक्षा जास्त सभासद असून नियमानूसार सर्वांना साखर वाटप केली जात असल्याचे काटे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.