Pune News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आणि खासगी सोसायट्यांच्या भिंतींवर ‘कमळ’ या चिन्हासोबतच मोदींना तिसर्यांदा पंतप्रधान करण्यासाठीची स्लोगन ( घोषवाक्य) पेंट करण्याचे आदेश भाजप पदाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. यानंतर शहरातील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी भिंतीला रंगवण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे शहरभरातील भिंतींवरती भाजपच्या कमळ चिन्ह असलेली भिंती चित्र दिसू लागली आहेत.
या भिंती चित्रांमुळे शहराच्या विद्रूपीकरण होत असल्याची टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून देखील आंदोलन करण्यात आली. यावेळी शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत आणि ती भिंती चित्रे त्वरित काढण्याचे संबंधिताला आदेश द्यावेत, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र यावरती प्रशासनांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. (Suhas Diwse News)
अखेर आता आचारसंहिता लागल्याने ही सर्व भिंती चित्रे काढणे क्रमप्राप्त झाले आहे. मात्र आता ही भिंती चित्रे काढण्याचा खर्च प्रशासनाच्या माथी पडणार का ? असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारण्यात येत होता. याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे लोकसभेचे निवडणूक अधिकारी असलेले सुहास दिवसे (Suhas Diwse) यांनी खुलासा केला आहे.
निवडणूक कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दरम्यान दिवसे म्हणाले, राजकीय कार्यकर्त्यांनी लावलेले बोर्ड, बॅनर चोवीस तासात काढून यायचे आहेत. भिंतींवरती जर काही लिहिले असेल करते पुढील 72 तासांच्या आत स्वच्छ करा, अन्यथा प्रशासनामार्फत ते काढून टाकले जाईल. मात्र त्याचा खर्च तुमच्याकडून वसूल केला जाईल आणि गुन्हेही दाखल केला जाईल असा इशारा जिल्हाधिकारी आणि पुणे लोकसभा (Pune Loksbha) मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यापूर्वीच्या निवडणुकीत आलेल्या तक्रारींवर प्रशासनाकडून कोणती कारवाई करण्यात आली? याचा अहवाल देखील येत्या दोन-तीन दिवसात जाहीर करण्यात येईल, असे सांगत आगामी निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यात येतील, असा दावाही दिवसे यांनी यावेळी केला.