सरकारनामा ब्यूरो
पुणे : माजी मुख्यमंत्र्याने पुन्हा इतर कुणा मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पहिलेच उदाहरण नाही.यापूर्वी अनेक माजी मुख्यमंत्र्यांनी नव्या मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम केल्याची उदाहरणे महाराष्ट्रात आहेत, अशी आठवण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सांगितली.
शंकराव चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर, अशोक चव्हाण अशी काही उदाहरणे या संदर्भात सांगता येतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी १९६७ पासूनच्या राजकारणातील अनेक घडामोडींच्या आठवणी सांगितल्या.
पवार म्हणाले ‘‘ एकदा मुख्यमंत्रीपद सांभाळल्यानंतर पुन्हा इतर मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली आहे. अर्थात हे एकमेव उदाहरण नाही. शंकराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. त्यानंतर माझ्या मंत्रिमंडळात शंकराव चव्हाण अर्थमंत्री होते. अलीकडच्या काळात शिवाजीराव पाटील निलंगेकर हे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. अशोक चव्हाण यांनीही उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले आहे.’’
फडणवीस यांनी स्वीकारलेले उपमुख्यमंत्रीपद आनंदाने स्वीाकरलेले नाही, असे पवार यांनी सांगितले. केवळ नाईलाजाने त्यांनी हे पद स्विकारल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते. मात्र, संघाचे संस्कार आणि पक्षाच्या आदेशामुळे त्यांना पक्ष नेतृत्वाने दिलेला आदेश मान्य करणे भाग पडल्याचे दिसत आहे, असे पवार यांनी सांगितले.
चौथा नव्हे ! सातारचा पाचवा मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला चौथा मुख्यमंत्री मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मी आता बारामतीचा असलो तरी माझे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील आहे. त्यामुळे त्याअर्थाने एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे पाचवे मुख्यमंत्री असल्याचे पवार यांनी सांगितले. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात माझे मूळ गाव असल्याचे पवार यांनी सांगितले.राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, बॅरिस्टर बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण, मी स्वत: आणि नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यात समावेश असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.