पती भाजपमध्ये गेल्याने नगरसेवक पत्नीची शिवसेनेने केली हकालपट्टी

निवडणुकीआधीच शिवसेनेचे संख्याबळ नऊवरून आठवर आले आहे.
Ashwini Chinchwade
Ashwini Chinchwade
Published on
Updated on

पिंपरी : मावळचे शिवसेना (Shivsena) खासदार श्रीरंग बारणेंचे (Shrirang Barne) उजवे हात समजले जाणारे पुणे जिल्हाप्रमुख (मावळ) गजानन चिंचवडे यांनी गेल्या महिन्यात २२ तारखेला शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि कमळ हाती घेतले. त्यानंतर महिन्यातच त्यांच्या पत्नी आणि नगरसेविका अश्विनी चिंचवडे (Ashwini Chinchwade) यांची शिवसेनेने पक्षातून गुरुवारी (ता.२१) रात्री उशिरा हकालपट्टी केली. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) निवडणुकीआधीच शिवसेनेचे संख्याबळ नऊवरून आठवर आले आहे.

दुसरीकडे शिवसेनेचे पाच नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा भाजपने (BJP) केला आहे. त्यांनीही धनुष्यबाण सोडला, तर शिवसेनेचे बळ इनमीन तीनवर येणार आहे. परिणामी चार महिन्यांनी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत पिंपरी पालिकेवर भगवा कसा फडकणार, अशी चर्चा शहरात सुरु झाली आहे. आगामी निवडणुकीत पिंपरीच नाही, तर पुणे पालिकेचाही महापौर शिवसेनेचा असेल, अशी डरकाळी शिवसेना नेते संजय राऊत फोडलेली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चिंचवडे यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे शिवसेनेच्या दादर, मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Ashwini Chinchwade
भाजपच्या प्रहारानंतर अखेर नितीन राऊतांची माघार

पती भाजपमध्ये गेल्याने त्यांची शिक्षा पत्नीला भोगावी लागल्याची चर्चा या हकालपट्टीनंतर शिवसेनेच्या वर्तुळात ऐकायला मिळाली आहे. दरम्यान, योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ, अशी आपल्या स्वभावाला साजेशी प्रतिक्रिया या हकालपट्टीवर नगरसेविका अश्विनी चिंचवडे व त्यांचे पती गजानन चिंचवडे यांनी 'सरकारनामा'ला दिली. त्यातून त्या पुढील निवडणूक भाजपकडूनच लढणार हे आता पूर्ण स्पष्ट झाले आहे. फक्त नगरसेवकपदाची टर्म संपेपर्यंत त्या शिवसेनेतून हकालपट्टी झाली, तरी पदावर कायम राहणार आहेत.

शिवसेना सोडल्यानंतर आपली नगरसेवक पत्नीही पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार का अशी विचारणा गजाजन चिंचवडे यांना गेल्या महिन्यात करण्यात आली होती. त्यावेळीही त्यांनी आजच्यासारखीच पत्नीच्या हकालपट्टीनंतर दिलेली योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, हीच प्रतिक्रिया दिली होती. या कारवाईमुळे चिंचवडेचा मार्ग शिवसेनेनेच मोकळा करून दिला आहे. ही हकालपट्टी त्यांच्या पथ्यावर पडणार आहे. त्यांना ती सोईची ठरणार आहे. भविष्यात चिंचवडे यासुद्धा भाजपमध्येच जाणार होत्या. पण, पक्षांतरबंदी कायद्याचा अडसर होता. अपात्रतेची टांगती तलवार होती. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरु होईपर्यंत म्हणजे जानेवारीपर्यंत त्यासाठी त्यांना थांबावे लागणार होते. मात्र, आता त्यांची हकालपट्टी झाल्याने त्या आता उघडपणे भाजपचे काम करू शकणार आहेत.

Ashwini Chinchwade
जसे चप्पल घालूनच बाहेर जातो, तसा मास्कचा वापर करा! पंतप्रधान मोदींचे आवाहन

आतापासूनच त्यांना २०२२ च्या निवडणुकीची तयारी करता येणार आहे. दुसरीकडे त्यांचे नगरसेवकपदही टर्म संपेपर्यंत कायम राहणार आहे. गेली दोन टर्म त्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. ज्येष्ठ या नात्याने त्यांनी स्थायी समिती सदस्यावर दावा केला होता. पण, तेथे त्यांना डावलले. नंतर रिक्त झालेल्या गटनेतेपदावर संधी मिळेल, असे त्यांना वाटले होते. पण, तेथेसुद्धा त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याने त्यांच्या पतीने अखेरीस कटू निर्णय घेत शिवसेनाच सोडली. तर, काल त्यांच्या पत्नीने पक्षाला जय महाराष्ट्र करण्याअगोदर शिवसेनेने त्यांची वाट मोकळी करून दिली. पतींनी शिवसेना सोडल्यानंतर नगरसेविका चिंचवडे यांनी शिवसेनेत असूनही प्रचारासाठी सोशल मिडियात भाजपचे निवडणूक चिन्ह कमळाचा वापर सुरु केला होता. ही पक्षविरोधी कारवाई धरून त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.

Ashwini Chinchwade
काँग्रेसला दे धक्का : माजी आमदारापाठोपाठ कार्यकारी अध्यक्षांची पक्षाला सोडचिठ्ठी

शिवसेनेचे पालिकेतील गटनेतेपद आणि स्थायी समिती सदस्य निवडीतून पिंपरी शिवसेनेत उलथापालथ सुरु झाली आहे. त्यात पहिला बळी तत्कालीन गटनेते राहूल कलाटे यांचा गेला. ते शिवसेनेचे आमदारकी लढविलेले अनुभवी नगरसेवक आहेत. गटनेते व स्थायी समिती सदस्य म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केलेले आहे. मात्र, गटबाजीच्या राजकारणातून त्यांचा बळी गेला. यावर्षी स्थायी समिती सदस्य म्हणून अश्विनी चिंचवडे यांचे पक्षाने दिलेले नाव डावलून त्यांनी आपल्या मर्जीतील मीनल यादव या दुसऱ्याच नगरसेविकेचे नाव दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यामुळे त्यांचे गटनेतेपद काढून घेण्यात आले.त्यानंतर हे पद गेले पाच महिने रिक्त आहे.दुसरीकडे पालिका निवडणूक चार महिन्यावर आली आहे.पण, पालिकेत शिवसेनेला सेनापती नसल्याने ती सध्या सैरभैर झाल्यासारखी आहे. त्यात शहरप्रमुखांचा करिष्मा नाही. त्यामुळे राज्यात सत्ता असलेल्या शिवसेनेला पिंपरी पालिकेत,मात्र विरोधात आणि ते ही पहिल्यापेक्षा कमी संख्येने बसावे लागेल, असेच चित्र सध्या दिसते आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com