पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (pdcc bank) संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने (ncp) बॅंकेच्या विद्यमान उपाध्यक्षा अर्चना घारे (मावळ), माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के (हवेली), निवृत्तीअण्णा गवारे, डॉ. वर्षा शिवले (दोघेही शिरुर) आदींसह विद्यमान नऊ संचालकांना डच्चू दिला आहे. (Pune District Bank elections, NCP rejected candidature of nine directors including Vice President)
दरम्यान, डच्चू दिलेल्या संचालकांपैकी दोघांनी याआधीच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे. त्यामध्ये इंदापूरमधील आप्पासाहेब जगदाळे यांनी विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीची साथ सोडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी हातमिळवणी केली आहे. मावळमधील बाळासाहेब नेवाळे यांनीही भाजपने सहा महिन्यांपूर्वी भाजपत समावेश केला आहे. हे दोन संचालक वगळता उर्वरित सात जणांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी थेटपणे नाकारली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलची घोषणा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी शुक्रवारी रात्री उशिरा केली, त्यात नऊ विद्यमान संचालकांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. या पॅनेलमधून उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे तीन मंत्री, तर दिलीप मोहिते, अशोक पवार, संग्राम थोपटे, संजय जगताप या चार आमदारांचा प्रामुख्याने समावेश आहे. शिवाय विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात, माजी अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनाही पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे.
दरम्यान,जिल्हा बॅंकेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी नाकारलेल्या संचालकांमध्ये विद्यमान उपाध्यक्षा अर्चना घारे (मावळ), निवृत्तिअण्णा गवारे (शिरूर), माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के (हवेली), आत्माराम कलाटे (मुळशी), तुळशीराम भोईर, वर्षा शिवले (शिरूर) आणि भालचंद्र जगताप (भोर) आदींचा समावेश आहे. यातील काहीजण माघार न घेता निवडणूक लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हवेलीत मैत्रीपूर्ण लढत
राष्ट्रवादी काँग्रेसला बारा तालुक्यांतील उमेदवारीचा तिढा सोडविण्यात यश आले. पण, हवेली तालुक्यातील तिढा सोडविण्यात मात्र यश आलेले नाही, त्यामुळेच बॅंकेचे ज्येष्ठ संचालक प्रकाश म्हस्के आणि पुण्याचे माजी नगरसेवक विकास दांगट या दोघांमधील लढतीत जो विजयी होईल, तो आपलाच या सूत्राने पक्षाकडून हवेलीतील लढत मैत्रीपूर्ण होईल, असे जाहीर केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.