PDCC Election : इंदापूरमधून जिल्हा बँकेवर कोण? जगदाळे, पाटील की भरणे..., राजकीय समीकरणांची रंगीत तालीम!

Dattatray Bharane Harshvardhan Patil : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकाच मतदारसंघातून सहकारातील बडे चेहरे आमनेसामने आल्याने इंदापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे.
Harshvardhan patil-dattatray bharane-appasaheb jagdale
Harshvardhan patil-dattatray bharane-appasaheb jagdaleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : आगामी काही महिन्यांत होणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. तालुक्‍यातून विविध संस्थांचे प्रतिनिधी निवडीचे ठराव दाखल होताच मातब्बर नेत्यांनी आपापली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ‘अ’ वर्ग सोसायटी मतदारसंघातून दिग्गजांनी शड्डू ठोकल्याने यंदाची ही लढत अत्यंत रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत.

इंदापूरच्या ‘अ’ वर्ग सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी संचालक अविनाश घोलप, दशरथ माने आणि प्रतापराव पाटील यांनी आपले ठराव दाखल केले आहेत. एकाच मतदारसंघातून सहकारातील हे बडे चेहरे आमनेसामने आल्याने तालुक्यातील राजकीय गणिते पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भरणेमामांचा ‘ब’ वर्गावरच रोख

दुसऱ्या बाजूला कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी मात्र ‘ब’ वर्गातील आपला ठराव कायम ठेवून राजकीय सस्पेन्स वाढवला आहे. इंदापूरच्या राजकारणात गेली २५ वर्षे भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. मात्र, अलीकडच्या काळात बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे भरणे-पाटील-जगदाळे यांच्यातील दुरावा काही प्रमाणात कमी झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे बँकेच्या या निवडणुकीत हे दिग्गज एकत्र येणार की परस्परविरोधी गट आमनेसामने ठाकणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Harshvardhan patil-dattatray bharane-appasaheb jagdale
PDCC Bank Election : अशोक पवार की नवा चेहरा? १३१ ठराव, ४६ मातब्बर अन् एकच खुर्ची; शिरूरचा ‘बँकिंग बॉस’ कोण?

२००२ चा 'तो' राजकीय धक्का

इंदापूरच्या जिल्हा बँकेच्या राजकारणाला मोठा इतिहास आहे. २००३ पर्यंत या तालुक्यावर हर्षवर्धन पाटील समर्थकांचे वर्चस्व होते, तर त्याआधी सुमारे चार दशके घोलप गटाची एकहाती सत्ता होती. १९९५ मध्ये अविनाश घोलप यांची तालुका गटातून बिनविरोध निवड झाली आणि याच काळात अजित पवार यांनी दत्तात्रेय भरणे यांना भटक्या जमाती प्रवर्गातून बँकेवर पाठवले. २००१ च्या बाजार समिती निवडणुकीनंतर आप्पासाहेब जगदाळे आणि दशरथ माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, अन् २००२ च्या बँकेच्या निवडणुकीत जगदाळेंच्या रणनीतीने घोलप गटाचा पराभव करत घोलपांचे दीर्घकाळाचे वर्चस्व संपुष्टात आणले. पुढे २००८ च्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांनी जगदाळेंना पाठिंबा दिला, तर २०१५ आणि २०२१ च्या निवडणुकीत जगदाळे बिनविरोध निवडून येत सलग बँकेवर राहिले.

कुटुंबातील ठरावांनी गणिते अधिक गतीमान

यंदा केवळ मुख्य नेत्यांनीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांनीही विविध गटांतून ठराव दाखल करून राजकीय सुरक्षितता जपल्याचे दिसते. जगदाळे कुटुंबातून आप्पासाहेब जगदाळेंच्या पाठोपाठ प्रदीप जगदाळे, यशराज जगदाळे आणि अमर जगदाळे यांचे ‘अ’ वर्गात ठराव आले आहेत. पाटील कुटुंबातून हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांचा ‘ब’ वर्ग, पुत्र राजवर्धन यांचा ‘क’ वर्ग आणि पत्नी भाग्यश्री पाटील यांचा ‘ड’ वर्गातून ठराव दाखल झाला आहे. घोलप कुटुंबातून अविनाश घोलप यांच्यासोबत बाळासाहेब, आदित्य व करण यांचे ‘अ’ वर्गात, तर मुलगी ॲड. पूजा यांचा ‘ब’ वर्गात ठराव आहे. तसेच भरणे कुटुंबातून दत्तात्रेय भरणे व पुत्र श्रीराज यांचा ‘ब’ वर्ग, तर बंधू रामचंद्र आणि भावजय नंदा व शोभा भरणे यांचे ‘अ’ वर्गात ठराव दाखल झाले आहेत.

नव्या समीकरणांची नांदी?

एकीकडे ‘अ’ वर्ग मतदारसंघातून दिग्गज नेत्यांची झालेली भाऊगर्दी आणि दुसरीकडे भरणे यांनी ‘ब’ वर्ग कायम ठेवून खेळलेली खेळी, या सर्व घडामोडींमुळे इंदापूर तालुक्यातील जिल्हा बँकेचे राजकारण अंतिम टप्प्यात कोणत्या वळणावर जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जुने वैर विसरून नवे मित्र जोडले जाणार की पारंपरिक राजकीय युद्ध पुन्हा पेटणार, याचा फैसला आगामी दिवसांतच होईल.

Harshvardhan patil-dattatray bharane-appasaheb jagdale
PDCC Bank : पुणे जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय खेळ सुरू; ‘आपला माणूस’ बसवण्यासाठी सोसायट्यांमध्ये रस्सीखेच!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com