Pune Political News : भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी नियुक्तीनंतर दोन महिन्यांनी आपली शहर कार्यकारिणी रविवारी जाहीर केली. ही कार्यकारिणी जगताप आणि चिंचवडचा 'टच'युक्त असल्याचे बोलले जात आहे. या शहर भाजपच्या नव्या टीममधून जुन्या कार्यकारिणीतील पाचपैकी चार सरचिटणीसांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तसेच माजी शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांनाही त्यात विशेष स्थान देण्यात आलेले नाही. (Latest Political News)
अध्यक्षानंतर दोन नंबरचे पद हे संघटन सरचिटणीसांचे जुन्या कार्यकारिणीत होते. त्यापदी अमोल थोरात हे संघ विचाराचे जुने भाजपाई होते. त्यांचाच पत्ता कट झाल्याने पक्षात तो चर्चेचा विषय आहे. त्यांनी शंकर जगताप (Shankar Jagtap) यांची नियुक्ती झालेल्या दिवशी म्हणजे १९ जुलैला पत्रक काढून त्यांच्या अध्यक्षपदाला कडाडून विरोध केला होता. जगताप कुटुंबावर तोफ डागली होती.
'चिंचवड मतदारसंघाचे आतापर्यंतचे आमदार हे जगतापच राहिलेले आहेत. हा मतदारसंघ २००९ ला अस्तित्वात आल्यापासून लक्ष्मण जगताप हे तीन टर्म तेथे आमदार होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी या आता आहेत, तर त्यानंतर त्यांचे दीर तथा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे धाकटे बंधू शंकर जगताप यांना शहराध्यक्षपद दिले गेले. यातून जगताप कुटुंबाला झुकते माप असून, भाजपमध्ये घराणेशाही होत आहे,' असा हल्लाबोल थोरातांनी केला होता. तसेच त्याविरुद्ध वरिष्ठांकडे तक्रारही केली होती.
आमदार लांडगे (Mahesh Landge) यांची कार्यकारिणी ही ११७ जणांची होती, तर जगतापांची ती आताच १२९ सदस्यांची असून, नाराजी दूर करण्यासाठी ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. थोरातांच्या जोडीने जुन्या कार्यकारिणीतील आमदार लांडगेंचे कट्टर समर्थक भोसरीतील विजय फुगे यांनाही नव्या कार्यकारिणीत स्थान दिलेले नाही. दुसरे सरचिटणीस आणि जुने एकनिष्ठ भाजपाई अॅड. मोरेश्वर शेडगे यांचाही पत्ता कट करण्यात आला आहे. बाबू नायर हे तिसरे जुने सरचिटणीस हे काँग्रेसमध्ये गेल्याने त्यांचा प्रश्नच उद्भवला नाही, तर पाचवे राजू दुर्गे यांना मात्र प्रमोशन देऊन उपाध्यक्ष आणि प्रवक्ते केले गेले आहे.
एकीकडे लांडगे समर्थकांचा पत्ता कट करताना त्यांचे विरोधक समजले जाणाऱ्या शैला मोळक यांची सरचिटणीसपदावर वर्णी लागली आहे. आमदार लांडगेच नाही, तर दिवंगत आमदार जगताप व त्यांची आताची शहरातील भाजपची टीम ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेली आहे.
नव्या कार्यकारिणीत दुर्गे, अजय पाताडे, शीतल ऊर्फ विजय शिंदे, नामदेव ढाके, विलास मडिगेरी यांसारख्या जुन्या एकनिष्ठ भाजपाईंना सरचिटणीसारखे महत्त्वाचे पद दिले आहे. ही पदे देऊन अंतर्गत नाराजी ओढवणार नाही, याची काळजी घेतल्याची चर्चा आहे. मात्र, हा प्रयत्न करूनही जुने भाजपाई नव्या टीमबाबत नाराज झाले आहेत. त्यांच्यातील काहींनी व त्यातही डावलल्या गेलेल्यांनी नवी कार्यकारिणी बोगस असल्याची तोफ नाव न छापण्याच्या अटीवर 'सरकारनामा'शी बोलताना डागली.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.