पिंपरी : पिंपरी ते कासारवाडी या पुणे-स्वारगेट या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा सुरु करण्यासाठी महामेट्रो कंपनीकडून आतापर्यंत अनेक मुहूर्त सांगण्यात आले. पण, ती काही सुरु झाली नाही. तसेच काहीसे पिंपरी-चिंचवडकरांच्या (Pimpri-Chinchwad) बाबतीत पाण्यासंदर्भात घडत आहे. गेली चार वर्षे शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे महिला त्रस्त आहेत. दररोज पाण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत अनेक मुहूर्त सांगितले. पण, ते सर्व हुकले आहेत.
आता १८ दिवसांनी १३ मार्चला, तर पालिकेची मुदतच संपत आहे. परिणामी भाजपच्या पहिल्या राजवटीत, तरी दररोज पाणी मिळण्याची शक्यता दुरावली आहे. पिंपरी पालिकेतील भाजपची गेल्या पाच वर्षातील भ्रष्टाचारी कारकिर्द व कारभाराविरोधात नुकताच (ता.१८ फेब्रुवारी) राष्ट्रवादी कॉंग्रेसने महापालिका भवनावर भाजप चले जाव मोर्चा काढला. त्यानंतर आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारात राष्ट्रवादीबरोबर सत्तेत एकत्र असलेल्या कॉंग्रेसने (Congress) भाजपला पाणीप्रश्नावरून घेरण्याचे ठरवले आहे. उद्या (ता. २४ फेब्रुवारी) पालिकेवर ते शहरातील पाणीपुरवठा नियमित करण्याकरिता म्हणजे दररोज पाणी देण्यासाठी हंडा मोर्चा काढणार आहेत.
राष्ट्रवादी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तेत असेपर्यंत म्हणजे २०१४ पर्यंत शहरात दररोज पाणीपुरवठा होत होता. २०१७ ला भाजप सत्तेत येताच वर्षभरातच दिवसाआड झाला. त्यामुळे महिलावर्गाची नाही, तर शहराच्या समस्त माजी महापौरांचीही तक्रार आहे. त्यांनी ती नुकतीच (ता.२१ फेब्रुवारी) महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शहराच्या माजी महापौरांच्या बैठकीत व्यक्तही केली. त्यांनीही शहरातील पाणीपुरवठा नियमित करण्याची मागणी केली आहे.
त्यानंतर आता पालिका निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसही त्यासाठी आक्रमक झाली आहे. उद्या ते त्याकरिता महापालिका मुख्यालयावर हंडा मोर्चाच काढणार आहेत. शहराला पाणीपुरवठा करणारे मावळातील पवना धरण गेल्यावर्षी पावसाळ्यात एकदा नाही, तर दोनदा भरूनही म्हणजे मुबलक पाणीसाठा असूनही शहरात दिवसाआड पाणीपुरवठा का होत आहे, असा सवाल कॉंग्रेसने विचारला आहे. शहराच्या महापौर, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी, तर गेल्यावर्षी दिवाळीलाच दररोज पाणीपुरवठा केला जाईल, असा शब्द दिला होता. नंतर, डिसेंबरात, त्यानंतर जानेवारीमध्ये, तर शेवटी फेब्रुवारीपासून पाणी नियमित दिले जाईल, असे सांगण्यात आले होते. एवढेच नाही, तर प्रशासनाच्या वतीनेही टप्याटप्याने पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांचे हे सर्व दावे फोल ठरले आहेत. परिणामी काही सोसायट्यांना टॅंकरच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत.
दाटवस्ती, झोपडपट्ट्यांमध्ये आणि उंच भागात कमी दाबाने व अनियमितपणे पाणीपुरवठा होत आहे. यामुळे दररोज पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी आणि सत्ताधारी भाजपाचा निषेध करण्याकरिता उद्या सकाळी पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी आज दिली. त्यानंतर तेथून पालिकेवर हंडामोर्चा काढला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.