
पिंपरी : अवघ्या चार महिन्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक (PCMC Election-2022) होणार आहे. त्यामुळे टर्म संपत आल्याने श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (PCMC) नगरसेवक दीड वर्षानंतर पुन्हा एकदा `अभ्यास` सहलींवर (Study Tour) निघाले आहेत.
याअगोदर देशातच नव्हे, तर परदेशातही झालेल्या या अशा अनेक `अभ्यास` सहलींचा का़डीचाही उपयोग शहरातील करदात्यांना झालेला नाही. त्यातून फक्त जनतेच्या लाखो रुपयांची उधळपट्टीच झालेली आहे. हे अभ्यास दौरे नसून ते अभ्यास सहली असल्याची कबूली पालिकेने सुद्धा दिली आहे.
याआधी पालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) अशा अभ्यास दौऱ्यांना त्यावेळी विरोधक भाजपने (BJP) कडाडून विरोध केला होता. अभ्यास दौऱ्यांच्या नावाखाली सहली तथा ट्रीप करीत असल्याची टीका त्यांनी त्यावेळी केली होती. आता सत्तेत असलेली भाजप या अभ्यास सहलींचे आयोजन करीत आहे. पहिल्या तीन वर्षातच त्यांचे अनेक नगरसेवक देश, विदेशात जाऊन सरकारी पैशातून मोठा अभ्यास करून आले आहेत. कोरोनामुळे त्यास काहीकाळ ब्रेक लागला होता. आता परिस्थिती निवळत असल्याने पुन्हा ही टूर टूर सुरु झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कायदा व सुव्यस्थेची काहीच समस्या नसलेल्या सिक्कीम या निसर्गसौंदर्यांने बहरलेल्या राज्यात जाऊन तेथे नसलेल्या या प्रश्नांचा अभ्यास पिंपरीतील नगरसेवक करणार आहे
यापूर्वीही राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात या राज्याचा झालेला नगरसेवकांचा अभ्यास दौरा हा सहलच ठरला होता. लाखो रुपये खर्च होऊनही त्याचा काडीचाही उपयोग झाला नसल्याचे नंतर निष्पन्न झाले होते. पालिकेच्या विधी समितीचे सदस्य सिक्कीमच्या सहलीवर जाणार आहेत. पण, किती जाणार, किती दिवसांचा हा अभ्यास दौरा आहे, त्यासाठी किती खर्च येणार याची माहिती देणे खूबीने टाळण्यात आले आहे. त्यासाठी फक्त खर्चास मंजूरी देण्याचा चार ओळींचा प्रस्ताव उद्याच्या (ता.२७ ऑक्टोबर) स्थायी समितीच्या बैठकीच्या अजेंड्यावर आहे.
लाखो रुपये अनाठायी खर्चाचे एक नव्हे, तर दोन तथाकथित अभ्यास सहलींचे विषय मान्यतेसाठी उद्याच्या स्थायीसमोर आहेत. दुसरा प्रस्तावही पहिल्यासारखाच चार ओळीचा, अस्पष्ट, अर्धवट व असंबद्ध असाच आहे.
त्यानुसार महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सदस्य बेंगलोरला जाणार आहे. मात्र, किती दिवसांसाठी, किती खर्चाची ही अभ्यास सहल आहे, हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने माहिती घेणे व पाहणी करण्यासाठी ही अभ्यास सहल आहे. कुठलीही चर्चा व विरोध न होता हे लाखो रुपये खर्चाचे दोन्ही विषय उद्या मंजूर होण्याची दाट शक्यता आहे. कारण, या दोन्ही सहलींत सर्वपक्षीय नगरसेवक आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.