
PMC Ward Restructure Controversy: राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांचं रणशिंग आता फुकलं गेलं आहे. या निवडणुकांसाठी प्राथमिक तयारी म्हणून प्रभाग रचना एक प्रमुख हत्यार मानलं जातं. आता या हत्याराचा वापर करुन भाजपनं आपला पहिला डाव टाकला आहे. त्यामुळं फक्त महाविकास आघाडीतच नव्हे तर महायुतीतील मित्र पक्षांमध्ये देखील चिंतेच वातावरण आहे. त्यातच अजित पवारांच्या शिलेदारांचे प्रभाग वेड्यावाकड्या पद्धतीनं तोडण्यात आल्यानं त्यांचे नेते आता संघर्षाच्या पवित्र्यात आहेत.
भाजपनं आपल्या विजयाचा फार्म्युला सेट करताना पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये जास्त नगरसेवक जिंकून महापालिकेतील सत्तेचा मार्ग निश्चित केला असल्याचं बोललं जात आहे. त्याउलट ज्या उपनगरांवर आणि नव्यानं महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्याठिकाणचे प्रभाग मोठे करून ते वेडोवाकडे तोडण्यात आले आहेत. यावरून आता महायुतीमध्ये संघर्ष सुरू झाला आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेमुळं महायुतीत नाराजी पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी प्रभाग रचनेत भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असल्याचा आरोप करत, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं. तसंच या प्रभाग रचनेमध्ये महायुतीचा धर्म पाळला गेला नसल्याचा आरोप केला आहे.
प्रभाग रचनेत शहराच्या मध्यवर्ती भागात (कसबा, पर्वती, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट) मोठे बदल झाले नसले, तरी उपनगरांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. उपनगरांतील प्रभाग मोठे केल्याने नगरसेवकांची संख्या वाढण्यास मर्यादा आली आहे. ज्याचा थेट फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार आहे. सुभाष जगताप यांनी सांगितले की, राष्ट्रवादीच्या शिलेदारांचे प्रभाग वेड्यावाकड्या पद्धतीने तोडण्यात आले आहेत ज्यामुळं पक्षात नाराजी आहे.
जगताप म्हणाले, "राज्य सरकारनं महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या सोयीचे प्रभाग होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रभाग रचना भाजपला फायदेशीर ठरली असून, काही प्रमाणात शिवसेनेलाही लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या हक्काच्या प्रभागांवर आघात झाल्याने पक्ष नाराज आहे. पुण्यातील समस्या सोडवण्यासाठी प्रभाग रचना विकासाला चालना देणारी हवी होती, सत्तेसाठी नव्हे. आम्ही यावर हरकत घेणार आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस आता याबाबत पुढील रणनीती ठरवणार आहे," असंही सुभाष जगताप यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.