Pune News : कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्श प्रकरणात नवीन माहिती समोर येत आहे. या अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे ससूनमध्ये ( sassoon hospital ) रक्ताने नमुने बदलण्याप्रकरणी अटक करण्यात आलेला ससूनमधील डॉ. अजय तावरे याचे पश्चिम महाराष्ट्रात दलाल असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासात ही माहिती समोर आली आहे. ससूनमध्ये चांगले उपचार मिळावेत, यासाठी हे दलाल डॉ. तावरे ( Ajay Tawre ) याच्याशी संपर्क साधत होते, असे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.
ससून रुग्णालयात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. या रुग्णालयात पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागातून मोठ्या संख्येने रूग्ण उपचारांसाठी येतात. त्यामुळे येथे सदैव प्रतीक्षा करावी लागते. कमी वेळात आणि चांगले उपचार मिळावेत आणि आपला क्रमांक लवकर लागावा म्हणून हे दलाल डॉ. तावरे याच्या संपर्कात होते.
त्याच्याशी संपर्क साधून तुम्हाला कमी वेळेत उपचार मिळतील, असे सांगून पेशंटच्या नातेवाईकांकडून पैसे घेतले जात असल्याची माहिती या चौकशीत समोर आली आहे. वरिष्ठ पोलिस (Police) अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.
पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात हे दलाल काम करत होते. त्यांच्या माध्यमातून किती रूग्णांच्या नातेवाईकांना फसविण्यात आले, याची माहिती गोळा करण्याचे काम आता पोलिसांनी सुरू केले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, नगर, छत्रपती संभाजीनगरमधील रूग्ण दलालांमार्फत ससूनमध्ये उपचारासाठी दाखल व्हायचे, अशी माहिती तपासात समोर आली आहे. त्यावरून पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने पोर्श कार चालवून एका दुचाकीला धडक दिली होती. यामध्ये दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एक तरूण-तरूणीचा समावेश होता. या अल्पवयीन मुलाने मोठ्या प्रमाणात मद्य प्यायले असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना सांगितले होते.
मात्र, रक्ताच्या नमुन्यात त्याने मद्य प्यायले आहे, हे सिद्ध होऊ नये, यासाठी त्याचे रक्ताचे नमुने बदलल्याचे समोर आले आहे. ससूनमधील न्यायवैद्यक शास्त्र विभागातील डॉ. अजय तावरे याच्या सांगण्यावरून हा उद्योग करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी डॉ. तावरे याच्यासह ससूनमधील एक डॉक्टर, एक शिपाई यांना अटक केली आहे. सध्या या सर्व आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.