
Pune APMC : दिलीप काळभोर यांच्या राजीनाम्यानंतर पुणे बाजार समितीचे नवीन सभापती कोण होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पण त्यापूर्वीच सभापतीपदासाठी इच्छुक नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरुवात केली असून एका इच्छुकाने तर थेट 11 संचालकांना घेऊन थेट गोवा गाठलं आहे. त्यामुळे सभापतीपदाचं राजकारण चांगलंच तापलं आहे. या संचालकांना आमदार झाल्याची भावना येत असावी.
अडीच वर्षापूर्वी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलचा धुव्वा उडवत सर्वपक्षीय पॅनेल विजयी झाले होते. पण त्यानंतरही अजित पवार यांचे खंदे शिलेदार असलेले दिलीप काळभोर पुणे बाजार समितीचे सभापती झाले. अडीच वर्षांच्या काळात काळभोर यांच्यावर अनेक आरोप झाले. बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून पुन्हा पूर्वीप्रमाणे प्रशासकांच्या हाती कारभार द्यावा, अशी मागणी झाली.
पर्वतीच्या आमदार आणि मंत्री माधुरी मिसाळ यांनीही थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संचालक मंडळाची तक्रार केली होती. अखेरीस सोमवारी (7 जुलै) काळभोर यांनी जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांच्याकडे सभापतीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नविन सभापती पदासाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून 18 जुलै रोजी निवडणूक होणार आहे.
काळभोर यांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद आणि दौंडचे आमदार राहुल कुल संचालकाची बैठक घेऊन सभापती पदाबाबतचा निर्णय घेणार होते. मात्र, सभापतीपदाचा राजीनामा सूपूर्त होताच 11 संचालकांनी हवापाणी बदलासाठी गोवा गाठले आहे. 11 जणांच्या ग्रुपमधील प्रकाश जगताप हे सभापती होण्यासाठी इच्छुक आहेत.
सभापतीपदासाठी गेल्या वर्षभरापूर्वी एका गटाने अविश्वास ठराव आणून सभापतीपदासाठी फिल्डींग लावली होती. मात्र दुसर्या गटाने परदेशात वारी करीत हा प्रयत्न असफल ठरविला होता. आता पुन्हा सभापतीपदासाठी फिल्डिंग लागली असून संचालकांना दुसऱ्यांदा पर्यटनासाठी पाठवण्यात आले आहे. या पर्यटन दौऱ्यात घोडेबाजार होणार असल्याचे बोलले जात आहे. या घोडेबाजार कोट्यावधींचा भाव निघण्याची शक्यता आहे.
बाजार समितीच्या सभापतीपदासाठी सध्या प्रकाश जगताप, रोहिदास उंद्रे आणि राजाराम कांचन इच्छुक आहेत. निवडणुकीपुर्वी सभापतीपदाच्या दुसर्या टर्मसाठी भाजपचे रोहिदास उंद्रे यांना शब्द दिल्याचे सांगितले जात आहे. सध्याचे राजकारण पाहता सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार हे 18 तारखेच्या निवडीवेळीच समोर येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.