Pune News : निवडणुका जिंकण्यासाठी उमेदवारांकडून वेगवेगळे डाव आणि रणनीती आखण्यात येतात. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील राज्यातील बहुतांश मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात 'तुतारी' चिन्ह असलेले अपक्ष उमेदवार उतरवण्यात आले होते.
अनेक ठिकाणी त्याचा फटका पक्षाच्या उमेदवाराला झाल्याचे देखील पाहायला मिळालं. नंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 'सेम टू सेम' नावाचा ट्रेंड फायदा मिळाला.
महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात नावात आणि आडनावांमध्ये साधर्म्य असलेल उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळालं. पुणे शहरातील वडगाव शेरी आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांविरोधात निवडणूक रिंगणात उतरले होते.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे उमेदवार बापू पठारे यांच्या विरोधात त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेला अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होता. या अपक्ष उमेदवाराला 1 हजार 260 मत मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या बापू पठारे यांना एक लाख 33 हजार मतं मिळाली.
पर्वती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्या विरोधात त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेले दोन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पहिल्या अश्विनी नितीन कदम यांना 378 मत मिळाली. दुसऱ्या अपक्ष अश्विनी अनिल कदम यांना 294 मते मिळाली. पुण्यातील दोन्ही विधानसभा मतदारसंघात नावातील साधर्म्य असलेल्या उमेदवारांनी निवडणूक निकालावरती जास्त प्रभाव टाकला नाही.
पुणे जिल्ह्याचा विचार केल्यास इंदापूर विधानसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या नावाशी साधर्म्य दोन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर महायुतीचे उमेदवार दत्तामामा भरणे यांच्या नावाशी साधर्म्य असलेला एक अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होता. मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या नावाचे साधर्म्य असलेल्या उमेदवाराला 452 मतं मिळाली, तर भरणे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या उमेदवाराला 354 मत मिळाली. इंदापुरात देखील सेम टू सेम चा प्रभाव दिसला नाही.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघात अजित पवारांची राष्ट्रवादी विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी, असा थेट सामना होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून देवदत्त जयवंतराव निकम यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत त्यांना 1 लाख 5 हजार 365 मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार देवदत्त शिवाजीराव निकम यांना 2 हजार 965 मते मिळवली. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांचा 1 हजार 500 मतांनी विजय झाला. अपक्ष उमेदवार देवदत्त निकम यांनी घेतलेली मते जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार देवदत्त निकम यांना मिळाली असती, तर ते विजयी झाले असते, अशा चर्चा सध्या आंबेगावच्या वर्तुळात चर्चिल्या जात आहेत. त्यामुळे 'सेम टू सेम'ने या ठिकाणी गेम केल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.