

Pune News : गेल्या काही दिवसांपासून पुणे भाजपमध्ये होणाऱ्या इन्कमिंग बाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. आज झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत या इन्कमिंग बाबत ठोस निर्णय होऊन पक्षप्रवेशाच्या तारखा निश्चित करण्यात येतील, असं बोललं जात होतं. मात्र आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये इन्कमिंग बाबत सावध पवित्रा घेण्यात आल्याचं पाहायला मिळालं. पक्षप्रवेशाबाबत कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये वाद झाल्याचे देखील सांगितलं जातं आहे, त्यामुळे पक्षप्रवेशाची तारीख आणखी पुढे ढकलली गेली असल्याचे देखील सांगितले जात आहे.
महापालिका निवडणुकीसाठीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर कोअर कमिटीची बैठक रविवारी खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, ज्येष्ठ नेते दिलीप कांबळे, खासदार मेधा कुलकर्णी, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर, आमदार भिमराव तापकीर, आमदार सुनिल कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार योगेश टिळेकर, श्रीनाथ भिमाले आदी उपस्थित होते.
या बैठकीबाबत माहिती देताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘महापालिका निवडणुकांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या दृष्टीने शहर पातळीवर आणखी काय करता येईल, याचे प्राथमिक नियोजन आज बैठकीत झाले. पक्षाकडून आगामी महापालिका निवडणूक लढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत.त्यामुळे आजपासून दोन दिवस शहर कार्यालयात अर्ज मागवले जातील. हे अर्ज प्रदेश कार्यालयाकडे पाठवले जातील. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार कोअर कमिटी चर्चा करून पुढील निर्णय घेईल.
तसेच शहरातील प्रत्येक प्रभागात कार्यकर्ते घरोघरी जातील, पुणेकरांशी चर्चा करतील. पुढील 20-25 वर्षातील पुण्याचे भवितव्य, पुण्याच्या विकासाबाबत पुणेकरांच्या अपेक्षा जाणून घेतील त्या माध्यमातून पक्ष आपला वचन नामा तयार करणार आहे.
‘आम्ही महायुतीचे घटक आहोत. ‘युतीधर्म’ पाळा, अशी भूमिका आमच्या वरिष्ठ नेत्यांनी मांडली आहे. स्थानिक परिस्थिती पाहून सामंजस्याने जिथे शक्य असेल तिथे महायुती म्हणून निवडणूक लढू जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढाई होईल. पक्षाच्या वरिष्ठ आदेशानुसार पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल,’असे मोहोळ यांनी सांगितले.
अन्य पक्षातील माजी नगरसेवकांना, नेत्यांना प्रवेश देण्याबाबत धोरण ठरवणार आहे. हे धोरण ठरल्यानंतर पक्ष प्रवेश होतील. पक्षप्रवेशाबाबत एकमताने निर्णय घेतला जाईल. जिथे संबंधित पक्षातील नेत्यांना प्रवेश दिल्याने पक्षाची ताकद वाढेल, तिथे प्रवेश दिला जाईल. मात्र, जिथे भाजपचा (BJP) विजय होईल असा कार्यकर्ता, संघटना सक्षम असेल तिथे कार्यकर्त्यांनाच प्राधान्य राहील, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.
मतदारयादीतील त्रुटी, गोंधळ यावर भारतीय जनता पक्ष गांभीर्याने काम करत आहे. मतदार यादीतील चुका सुधारल्या गेल्याच पाहिजेत. परंतु, त्यावर राजकारण करता कामा नये, असेही यावेळी मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.