Pune Congress: काँग्रेसच्या अंतर्गत बाबी चव्हाट्यावर आणणं चुकीचं; बागवेंशी चर्चा करायला तयार!

Arvind Shinde on Ramesh Bagwe Pune Congress dispute: रमेश बागवे यांना माझ्या कार्यशैलीबाबत काही आक्षेप असेल तर त्यांनी त्याबाबत माझ्याशी चर्चा करणं आवश्यक होतं. काँग्रेसच्या अंतर्गत बाबी चव्हाट्यावर आणणे अत्यंत चुकीचे असून अजूनही रमेश बागवे यांच्याशी मी चर्चा करायला तयार आहे.
 Arvind Shinde, Ramesh Bagwe
Arvind Shinde, Ramesh BagweSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नुकतीच दिल्लीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. भेटीमध्ये पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांना बदलून नव्या काँग्रेस कार्यकर्त्याला या पदावर काम करण्याची संधी द्या, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. या सर्व घडामोडींवर पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी 'सरकारनामा'ला प्रतिक्रिया दिली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष बदलावरून धुसफूस सुरू आहे. याच मुद्द्यावरून सध्या काँग्रेसमध्ये तीन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये पहिला गट हा पुणे शहराध्यक्ष पदावरून अरविंद शिंदे यांना खाली खेचण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करत आहे. तर दुसरा गट अरविंद शिंदे हे शहराध्यक्ष पदावर राहावे यासाठी फिल्डिंग लावून आहे. काँग्रेसचा तिसरा मोठा गट हा सध्या तटस्थ भूमिकेत आहे.

अरविंद शिंदे म्हणाले, "ज्या शिष्टमंडळाने काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेऊन शहराध्यक्ष बदलण्याची मागणी केली. त्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रमेश बागवे यांचा समावेश होता. रमेश बागवे यांना माझ्या कार्यशैलीबाबत काही आक्षेप असेल तर त्यांनी त्याबाबत माझ्याशी चर्चा करणं आवश्यक होतं. काँग्रेसच्या अंतर्गत बाबी चव्हाट्यावर आणणे अत्यंत चुकीचे असून अजूनही रमेश बागवे यांच्याशी मी चर्चा करायला तयार आहे. माझ्या कार्यशैलीबाबत काही समस्या असतील तर त्या चर्चेतून सुटु शकतात,"

मी पुणे शहराचा अध्यक्ष असताना यंदाची लोकसभा निवडणूक लढली गेली. माझ्या कार्यशैलीचा फटका या लोकसभा निवडणुकीत बसल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. मात्र आकडेवारी पाहिल्यास लोकसभा निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांना सर्वाधिक लीड हे माझ्या प्रभागातून मिळाले आहे.

पुणे लोकसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना एकमेव कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात 16000 चे लीड मिळालं त्यामध्ये साडेआठ हजारच लीड हे माझ्या प्रभागातून मिळाले आहे. मी शहराध्यक्ष असतानाच कसबा पोट निवडणुकीमध्ये काँग्रेसचा मोठा विजय देखील झाला आहे. त्यामुळे माझ्यावर आक्षेप घेणाऱ्या आणि माझ्या कार्यपद्धतीवर बोट ठेवणाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रभागातून रवींद्र धंगेकर यांना किती मताधिक्य मिळवून दिले हे सांगावं, असे आव्हान अरविंद शिंदे यांनी संबंधितांना दिले.

 Arvind Shinde, Ramesh Bagwe
Vishal Patil: भाजपचे राजकारण घाणेरडं; विशाल पाटील संतापले; लोकसभेत मुद्दांच मांडू देत नाहीत...

शहराध्यक्ष बदलासाठी काय झाल्यात घडामोडी?

आगामी विधानसभा, महापालिका निवडणुका लक्षात घेता काँग्रेस पक्षाला पुण्यात सक्षम करण्यासाठी तातडीने शहर नेतृत्त्वात बदल करावा, अशी मागणी काँग्रेसमधील एका शिष्टमंडळाने पक्षाचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती.

लोकसभा निवडणुकीत पक्षाची हानी होईल, असे वर्तन शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले आहे. त्याचा फटका पक्षाला बसला आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेते पुण्यात आले तरी, त्यांची भेटही शिंदे यांनी घेतली नव्हती. बूथ कमिट्यांमध्ये बोगस नोंदणी झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला कसबा, कँटोन्मेंट, शिवाजीनगर या मतदारसंघात विजय मिळवायचा असेल तर, आत्तापासूनच तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी पक्ष संघटना भक्कम करण्यासाठी शहर नेतृत्त्वात बदल करण्याची गरज आहे,' असं या शिष्टमंडळातून सांगण्यात आलं होत.

यावेळी पक्षातील वरिष्ठांनी शहराध्यक्षपदासाठी कोणता पर्याय उपलब्ध आहे, असं विचारलं असता माजी नगरसेवक राहिलेल्या चंदू कदम यांचं नाव पुढे केले होत. या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर देखील प्रदेश पातळीवर शहराध्यक्ष बदलाबाबत कोणत्याही हालचाली झाल्याच्या पाहायला मिळालं नाही. त्यानंतर आता काँग्रेसच्या या शिष्टमंडळाने दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आहे.

शिष्टमंडळाने मलिकार्जुन खर्गे यांच्यासोबत आगामी विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा केली आहे. राज्य सरकारच्या विरोधात असलेल्या वातावरणाचा कशा पद्धतीने वापर करून काँग्रेसला यश मिळवता येईल, यासाठी काय करावे लागेल या संदर्भात शिष्टमंडळाने खर्गे यांच्याशी चर्चा केली.

शिष्टमंडळाकडून आगामी विधानसभा निवडणुकीबाबतचं निवेदन देण्यात आलं. या निवेदनामध्ये पुण्यातील शहराध्यक्ष बदलावा याबाबत देखील मागणी करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सध्याचे शहराध्यक्ष असलेले अरविंद शिंदे यांना बदलणे किती आवश्यक आहे. हे पटवून देण्याचा प्रयत्न शिष्टमंडळाकडून करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com