

Pune politics update : पुण्याचे माजी खासदार व माजी केंद्रीय राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडले आहेत. तत्कालीन महापालिका आयुक्त महेश झगडे यांनी कलमाडींचा उल्लेख देशातील एक वादळी नेतृत्व असा केला आहे. तसेच आयुक्त असतानाची एक आठवणही सांगितली आहे.
महेश झगडे यांनी सोशल मीडियात याविषयी एक पोस्ट केली आहे. कलमाडी यांना श्रध्दांजली अर्पण करत त्यांनी महापालिकेतील एक आठवण सांगितली. झगडे महापालिकेचे आयुक्त असताना केवळ एकदाच कलमाडी त्यांना कार्यालयात भेटायला आले होते. त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारीही होते.
या भेटीविषयी सांगताना झगडे यांनी म्हटले आहे की, ‘अनेक प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली, त्यावर त्यांनी हे सर्व प्रश्न तातडीने निकाली निघाले पाहिजेत, असे निक्षून सांगितले. शेवटी त्यांनी काही खाजगी चर्चेसाठी मला ऑफिस लगतच्या कक्षात जाण्याचे सुचविले. तेथे आम्ही दोघेच होतो. काहीतरी त्यांचे खाजगी आणि अवघड काम असावे असे मला अपेक्षित होते. मी त्यांना त्याबद्दल विचारले. त्यावर त्यांनी तसे काहीही खाजगी काम नसल्याचे सांगितले.’
‘पुढे त्यांनी असेही सांगितले की एक महत्वाची बाब ते त्या गर्दीत बोलू शकत नव्हते, ती म्हणजे, ” मी आलो म्हणजे नगरसेवकांनी बाहेर जे सांगितले ते सर्व करावेच असे नाही, तुम्हाला शक्य आणि नियमात असेल तेच करा, त्यांनी चुकीचे काही सांगितले तर अजिबात करू नका. शहराच्या पायाभूत सुविधांवर लक्ष्य केंद्रित करा, त्यासाठी माझा आणि कांग्रेसचा तुम्हाला पाठिंबा असेल. काही समस्या आल्या तर बिनधास्तपणे मला सांगा. केंद्र सरकारमध्ये काही मदत लागली तर मला फ़ोन करा आणि दिल्लीला आल्यानंतर चहासाठी भेटत चला”, असे कलमाडी म्हणाल्याचे झगडेंनी सांगितले आहे.
कलमाडी यांची ही विधाने ऐकल्यानंतर त्या क्षणी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच पैलू जाणवल्याचे झगडे यांनी म्हटले आहे. सत्तेच्या कोलाहलापलीकडे उभा असलेला, प्रशासकीय स्वायत्ततेचा मान राखणारा आणि शहराच्या हिताला अग्रक्रम देणारा नेता. राजकीय जीवनात अशा प्रकारात बसणारी अनेक व्यक्तिमत्त्वे जवळून पाहण्याचा योग आला; परंतु आज त्यांपैकी हे नेतृत्व हरपले आहे, ही जाणीव मनात हळहळ निर्माण करते. काळाच्या ओघात मते, भूमिका, प्रतिमा बदलत जातात; पण काही भेटी आणि काही वाक्ये स्मरणात खोलवर रुतून बसतात—आणि ही भेट तशीच एक होती, अशी भावना झगडे यांनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.