Senior Congress leader Suresh Kalmadi passed away in Pune: पुण्याचे माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते, त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरु होते. मात्र आज (6 जानेवारी, मंगळवारी) दरम्यान पहाटे साडे तीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. मंगळवारी दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव त्यांच्या एरंडवणे येथील "कलमाडी हाऊस" येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी साडे तीन वाजता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
एकेकाळी पायलट असलेल्या कलमाडी यांची पुण्याच्या राजकीय वर्तुळात काही वर्षांपर्यंत ‘सबसे बडा खिलाडी’ अशी होती. त्यावेळी ‘सबसे बडा खिलाडी, सुरेश कलमाडी’ हा केवळ नारा नव्हता तर ते उघड सत्य होतं. पुण्याच्या राजकारणातील ‘भाई’ म्हणजेच सुरेश कलमाडी यांना ‘क्लीन बोल्ड’ करणारा नेता ते राजकारणात सक्रिय असेपर्यंत तरी दुसरा कुणी नव्हता. 1980 च्या दशकापासून सुरेश कलमाडी नावाच्या व्यक्तीचा राजकारणातील दबदबा वाढत गेला.
पायलट, पुणे युवक काँग्रेस, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष, पुण्याचे खासदार, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष, भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष, अॅथलेटिक्स संघनटेचे अध्यक्ष, राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजक अशी विविध पदे कलमाडी यांनी उपभोगली. त्यांच्याच नेतृत्वात 1992, 1997 आणि 2002 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला निर्भेळ यश मिळालं होतं. काँग्रेसनं सलग 15 वर्षे पुण्यात सत्ता उपभोगली.
सुरेश कलमाडी यांचा राजकीय प्रवास :
पुण्यातील NDA म्हणजेच नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीमधून कलमाडी 1960 मध्ये इंडियन एअर फोर्समध्ये मध्ये दाखल झाले होते. स्कॉड्रन लीडर म्हणून ते सेवानिवृत्त झाले. 1965 आणि 1971 च्या पाकिस्तानाविरुद्धच्या युद्धात भारतीय वायुसेनेचे पायलट म्हणून कर्तव्य बजावले होते. 1974 मध्ये सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूना कॉफी हाऊसच्या माध्यमातून व्यावसायिक म्हणून आपली ओळख निर्माण करण्यास सुरवात केली. याचदरम्यान त्यांची शरद पवारांशी भेट झाली. त्याकाळी कलमाडींमधील राजकारणी पवारांनी हेरला.
प्रचंड महत्वाकांक्षी असलेल्या कलमाडींना शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय केले. पवारांच्या सांगण्यावरूनच त्यांना 1977 मध्ये पुणे युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. काही दिवसांतच ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचेही अध्यक्ष बनले. शरद पवार एस काँग्रेसमध्ये गेल्यानंतर तेही त्यांच्यासोबत गेले. पवारांनी 1982 मध्ये त्यांना राज्यसभेचे खासदार केले. 1982 ते 1996 आणि पुन्हा 1998 असे तीन वेळा ते राज्यसभेचे सदस्य होते. ते केंद्रात रेल्वे राज्यमंत्रीही होते.
1996 ते 98 आणि पुढं 2004 व 2009 च्या लोकसभा निवडणुकीत कलमाडींनी भाजपच्या उमेदवारांना पराभूत केलं. 1998 च्या निवडणुकीत कलमाडी यांनी विठ्ठल तुपे यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, पण त्यांना जवळपास 3, लाख 40 हजार मतं मिळाली होती. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे विश्वासू राम प्रधान यांचा 1 मताने पराभव करून कलमाडी यांनी 1998 ची राज्यसभेची निवडणूक देखील गाजवली.
राजकारणात जम बसवत असताना कलमाडींनी देशातील क्रीडा संस्थांमध्येही वर्चस्व गाजवले. युवक काँग्रेसमध्ये सक्रिय असतानाच 1980 मध्ये महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष बनले. 1996 ते 2012 पर्यंत ते भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष होते. 2000 ते 2013 या कालावधीत आशियाई त्यांनी अॅथलेटिक्स संघनटेचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं. राष्ट्रकुल स्पर्धा भारतात आणण्यात त्यांचाच मोठा वाटा होता. पण याच राष्ट्रकुल स्पर्धांनी त्यांच्या राजकारणावर मोठा डाग लावला.
ऑक्टोबर 2010 मध्ये दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झाली होती. या स्पर्धेच्या संयोजक समिताचे अध्यक्ष सुरेश कलमाडी होते. त्यांच्यावर राष्ट्रकुल स्पर्धेत सुमारे 1 हजार 700 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. त्यावेळी हा तपास केंद्र सरकारने सीबीआयकडे सोपविला होता. त्यानंतर 25 एप्रिल 2011 रोजी सीबीआयने त्यांना अटक केली होती.
क्विन्स बॅटन रिलेच्या आयोजनात गैरव्यवहार केल्याचा गुन्हा दाखल करुन कलमाडी आणि त्यांचे सहकारी ललित भानोत, व्ही. के. वर्मा, शेखर देवरुखकर यांना अटक केली होती. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध सीबीआयच्या हाती ठोस पुरावे मिळाले होते. त्यामुळे सीबीआयने कलमाडींना 120 ब आणि 420 कलमाखाली गुन्हा दाखल करुन अटक केली होती.
तेव्हापासून ते जवळपास 9 महिने दिल्लीच्या तिहार तुरुंगात होते. त्याच दरम्यान, सीबीआयच्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लाँडरिंगचा गुन्हा नोंदविला होता. पण 2014 मध्ये सीबीआयने त्यांचा क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता, "तपासादरम्यान कोणतेही गुन्हेगारी पुरावे समोर आले नाहीत." तसेच एफआयआरमधील आरोप सिद्ध होऊ शकत नाहीत असेही म्हटले होते. काही दिवसांपूर्वी ईडीनेही या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.