Pune Crime News: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar)यांची रविवारी हत्या करण्यात आली. या हत्येने शहर परिसरामध्ये खळबळ उडाली असून यानंतर सातत्याने आंदेकर टोळीचं नाव समोर येत आहे.
25 वर्ष पुण्याच्या मध्यवर्ती भागात दहशत (Pune crime)पसरवणाऱ्या या टोळीचा नेमका इतिहास काय आणि त्याचा हत्या झालेल्या वनराज आंदेकर यांच्याशी काय संबंध असे प्रश्न सध्या जनसामान्यांमधून विचारले जात आहेत.
पुण्यातील काही जुन्या गुन्हेगारी टोळ्यांपैकी आंदेकर ही टोळी (Andekar Gang) आहे. तब्बल 25 वर्ष गुन्हेगारी कारवायांमध्ये आंदेकर टोळीचा हात असल्याचं दिसते. 25 वर्ष दहशत माजवणाऱ्या या टोळीचा मोरक्या बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर हा आहे.
1985 पासून खून, खुनाचे प्रयत्न, धमक्या देणे, शस्त्रे बाळगणे, अपहरण अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे सूर्यकांत आंदेकर याच्या विरुद्ध फरासखाना, खडक व समर्थ या पोलिस स्टेशनमध्ये दाखल आहेत. सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलिस ठाण्यात देखील काही गुन्हे दाखल आहेत.
काही वर्षांपूर्वी आंदेकर आणि माळवदकर या गॅंगमध्ये टोळी युद्ध भडकल्याचे पाहायला मिळालं. यात टोळी युद्धातूनच प्रमोद माळवदकर या गुंडाचा खून करण्यात आला होता. प्रकरणात सूर्यकांत आंदेकरला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. शिक्षा पूर्ण करून परत आल्यावर सूर्यकांत याने आपला गुन्हेगारीचा पाढा कायम ठेवला.
आंदेकर टोळीकडून अलिकडेच अतुल कुडले याच्या खुनाचाही प्रयत्न झाला होता. बंडू आंदेकर याच्यासह आंदेकर कुटुंबाचा टोळीशी संबंधित गुन्हेगारी कारवायांचा कुप्रसिद्ध इतिहास आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी बंडू आंदेकर याच्यासह अन्य सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याआंतर्गत (मोक्का) कारवाई केली होती. मात्र या प्रकरणात त्याला 5 जानेवारी 2024 रोजी जामीन मिळाला होता.
खांडेकर टोळीचा मोरक्या असलेल्या बंडू उर्फ सूर्यकांत खांडेकर हे हत्या झालेले माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचे वडील आहेत. असे असले तरीही वनराज आंदेकर यांचे अद्याप कोणताही मोठ्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये नाव समोर आले नव्हते. गेल्या पाच वर्षातील नगरसेवक म्हणून कार्यकाळात त्यांची संयमी आणि शांत स्वभावाचे नगरसेवक म्हणूनच ओळख होती.
२०१७ 2017 मध्ये महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर वनराज आंदेकर हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या देखील 2007 आणि 2012 या दोन वेळा नगरसेविका होत्या.
वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकात आंदेकर हेही नगरसेवक होते.त्यांच्या कुटुंबातील वत्सला आंदेकर यांनी महापौरपद भुषविले आहे. 1998-99 मध्ये पुणे महापालिकेच्या महापौर म्हणून निवडून आल्या होत्या.
यापूर्वी देखील पुणे राजकीय हत्यांनी हादरलं आहे. 2003 मध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार माधुरी मिसाळ यांचे पती सतीश मिसाळ यांची हत्या झाली होती. 2021 देखील शिवसेना कसबा युवा सेनेचे विभाग प्रमुख दीपक विजय मारटकर यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार राजकीय वैरातून हत्या करण्यात आली.
पुण्यातील मावळ तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची 2023 मध्ये प्रतिशिर्डी साई बाबांच्या मंदिरासमोर कोयत्याने वार करून हत्या झाली होती.गोपाळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरपंच म्हणून बिनविरोध निवडणूक जिंकले होते.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.