Local Body Elections : शरद पवारांच्या पक्षातून मोठं ‘इन्कमिंग’? भाजपमध्ये पेटला अंतर्गत वाद, कारवाईच्या भीतीने कार्यकर्ते मौनात...
Pune News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अशीच चर्चा सध्या पुण्यातील एका मोठ्या राजकीय प्रवेशाची देखील सुरू आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकमेव आमदार बापू पठारे हे आहेत. त्यांचे पुत्र आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत.
प्रवेशाच्या चर्चा म्हणजे अफवा असल्याचा खुलासा यापूर्वी देखील आमदारांकडून करण्यात आला आहे. असं असलं तरी अंतर्गत गोठातून अनेक घडामोडी घडत असल्याचं देखील सांगितले जात आहे. भाजपामधील काही वरिष्ठ नेतेमंडळी हे या पक्ष प्रवेशासाठी पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले जात आहे. तर स्थानिक नेते मंडळींनी मुंबईपर्यंत प्रवेश रोखण्यासाठी ताकद लावली असल्याचे देखील बोलले जात आहे.
आमदार पुत्राचा प्रवेश होणार असल्याबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे भाजपमधील स्थानिक पदाधिकारी, नेते आणि इच्छुकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार सातत्याने भाजपाच्या वरिष्ठ नेतेमंडळींच्या भेटी घेत असल्याचं सांगितलं जात आहे.
काही दिवसांपूर्वी वडगाव शेरी भागातील एका शिष्टमंडळाने शहराध्यक्षांची देखील भेट घेऊन अनेक वर्षापासून महापालिका लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या निष्ठावंतांना संधी द्यावी, आमच्या भागातून कोणताही इन्कमिंग करून घेऊ नये, अशी विनंती केली असल्याचं सांगितलं जात आहे. आमदार पुत्रांच्या प्रवेशाच्या फक्त चर्चाच सुरू असताना कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसताना आत्ताच मोठ्या प्रमाणात विरोध सुरू झाला आहे.
आपण समोर येऊन बोललो तर पक्षशिस्तीचा भंग होईल आणि आपली संभावित उमेदवारी देखील धोक्यात येईल या भीतीने कार्यकर्ते समोर येऊन बोलायला तयार नाहीत. मात्र पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत असल्याचं सांगितलं जात आहे. वारे बदलते त्याप्रमाणे पक्ष बदलून संधीसाधू लोक पक्षात घेऊन पक्षासाठी प्रामाणिक पणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे काय असा प्रश्न स्थानिक पदाधिकारी विचारत आहेत.
येत्या पुणे महापालिका निवडणुकीत पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यालाच संधी मिळावी, अशी मागणी बऱ्याच कार्यकर्त्यांनी पत्र पाठवून मंडळ अध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांच्याकडे केली असल्याची जोरदार चर्चा वडगावशेरी मतदारसंघात सुरू आहे. आम्ही भारतीय जनता पक्षाचे वर्षानुवर्षे काम करीत आहोत. बऱ्याच दिवसांपासून आपल्या मतदारसंघात बाहेरील पक्षातील हे येणार ते येणार अशा अफवा आम्ही ऐकत आहोत. त्यामुळे याबाबत पक्षाने भूमिका स्पष्ट करावी आणि निवडणुकीत पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच तिकीट देण्यात येईल, याबाबत विश्वास द्यावा, अशी मागणी पक्षातून होऊ लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.