Pune Lok Sabha : धंगेकर, जोशी, शिंदेंनंतर आता माजी मंत्र्याने पुणे लोकसभेवर ठोकला दावा!

Pune Politics : बाळासाहेब शिवरकर यांनी पक्षश्रेष्ठींकडे लोकसभा उमेदवारीसाठी दावा केला आहे.
Balasaheb Shivarkar
Balasaheb ShivarkarSarkarnama

Hadapsar : पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक हाेत आहे. राज्यात पुणे लोकसभा मतदारसंघ महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचाही मानला जातो. त्यामुळे विविध राजकीय पक्ष येथे आपली ताकद पणाला लावत असतात. सध्या महायुती आणि इंडिया आघाडीची या जागेसाठी जोरदार तयारी सुरू आहे.

आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची नावे पुणे लोकसभेसाठी चर्चेत असताना आता काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी उमेदवारीवर दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

पुणे लोकसभेसाठी आजपर्यंत सतरा वेळा निवडणुका झाल्या. त्यामध्ये तब्बल दहा वेळा काँग्रेसने तर चार वेळा भाजपने ही जागा मिळविली आहे. मागील दोन्ही वेळा भाजपने या जागेवर विजय मिळवला आहे. केंद्र व राज्यात असलेली सत्ता, तसेच गेली दोन वेळची सलगता यामुळे भाजप आजही ही जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेच. आपल्या हातातून ही जागा गेल्याची खंत आणि खदखद काँग्रेसमध्ये आजही दिसून येत आहे.

Balasaheb Shivarkar
Manoj Jarange: आरक्षण हाच माझा उपचार, जरांगेंनी आरोग्य पथकाला परत पाठवलं; मोदींवर बोलणं टाळलं!

मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांच्या विजयाने काँग्रेसने पुन्हा शहरात जम बसविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी वेगवेगळ्या निवडणुकांसाठी काँग्रेसमधील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत त्यामुळे काँग्रेस आघाडीला संधी जाणवू लागली आहे. येणाऱ्या निवडणुकीत आघाडीकडून कोण उमेदवार असेल, अशी चर्चा असतानाच माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी पक्षश्रेष्ठींकडे लोकसभा उमेदवारीसाठी दावा केला आहे.

सुमारे पाच दशकांपासून काँग्रेस पक्षाबरोबर जपलेली निष्ठा, कार्यकर्ता म्हणून दिलेले योगदान, तीन वेळा नगरसेवक, एकदा महापौर, तीन वेळा आमदार, एकदा राज्यमंत्री आणि शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपण यशस्विपणे सांभाळलेली आहे. त्यातूनच शहरातील सर्व घटकांशी आपण सलोख्याचे वातावरण ठेवलेले आहे, अशी पार्श्वभूमी सांगत शिवरकर यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

शिवरकर म्हणाले, "गेली पाच दशकांपासून आपण काँग्रेस पक्षासाठी निष्ठेने काम करीत आहोत. नगरसेवकापासून राज्यमंत्रिपदापर्यंत त्यामुळे मला संधी मिळाली. या काळासह आजपर्यंत पक्षाच्या वाढीसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून मी कार्यरत आहे. सर्व सामाजिक घटकांना पक्षाशी बांधण्याचे काम आजही माझ्याकडून होत आहे. पक्षाच्या अडचणीच्या काळात शहराध्यक्ष पद घेऊन येथे पक्षाला गतवैभव प्राप्त करून दिले आहे. वेगवेगळ्या पदांवर काम करताना शहराच्या सर्वांगीण विकासात मोठे योगदान दिले आहे.

पक्षाच्या सध्याच्या अडचणींच्या काळात सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची आपली हातोटी शहरात लाभदायक ठरेल. विविध संस्था, संघटना, समाज घटक यांच्याशी आपले सलोख्याचे संबंध आहेत. नेतृत्व करताना विश्वासाचे वातावरण कायम ठेवले आहे. त्यामुळे पुणे लोकसभेत माझ्या रूपाने पक्षाला पुन्हा संधी निर्माण होऊ शकते. पुण्याला राजकीय क्षेत्रातील अनुभवी उमेदवाराची गरज असून, आपण त्या दृष्टीने परिपूर्ण आहोत. त्यामुळे मी पहिल्यांदाच लोकसभेसाठी हा दावा केला आहे.'

याबाबत शिवरकर यांनी एक पत्रकही प्रसिद्ध केले आहे. पुणे शहर आज चारही बाजूने विस्तारले आहे. शहराच्या समस्या अनेक अर्थाने बिकट बनल्या आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठी काँग्रेसला एका अनुभवी आणि सक्षम नेतृत्वाची गरज आहे. पक्ष एका नाजूक राजकीय वळणावर असताना दमदार पद्धतीने पुणेकरांसाठी वाटचाल करू शकेल अशा आश्वासक उमेदवाराची पक्षाला गरज आहे. ती गरज आपण पूर्ण करू शकतो, असा विश्वासही शिवरकर यांनी या पत्रकात व्यक्त केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत मीच खरा दावेदार आहे, असा दावा माजी मंत्री चंद्रकांत ऊर्फ बाळासाहेब शिवरकर यांनी केला आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारीसाठी अधिकृत दावेदारीही केली आहे, असेही शिवरकर यांनी म्हटले आहे.

Edited By : Mangesh Mahale

Balasaheb Shivarkar
Maratha Reservation News : 'मराठा आरक्षणासाठी मी जीव देत आहे,' आणखी एका युवकाने संपवले आयुष्य...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com