Pune News: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाचे इच्छुक बाशिंग बांधून तयार आहेत. आपल्या पक्षाने उमेदवारी जाहीर करण्याआधीच हे स्वयंघोषित उमेदवार आता शहरभर 'फ्लेक्सबाजी' करताना दिसत आहेत. यात भाजप आघाडीवर असले तरी काँग्रेस देखील मागे नाही.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांच्याकडून पुण्यातील वास्तव परिस्थितीवर आधारित अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहे. 'प्रत्येक समस्येवर एकच उपाय तो म्हणजे काँग्रेस!' या आशयाचे पोस्टर लावून काँग्रेसच्या काळात झालेल्या कामांची माहिती या पोस्टरच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'पुणे हे आधी विद्येचे माहेरघर होते. आज ते ट्रॅफिकचे घर झाले आहे. पुण्यासारख्या शैक्षणिक शहरात ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट वाढला आहे. पुण्यातील वाढते प्रदूषण, बेरोजगारांची वाढती संख्या म्हणजे या सगळ्या समस्यांवर काय उपाय असेल तर तो म्हणजे काँग्रेस. सगळ्या समस्या संपवायच्या असतील, तर काँग्रेस हा एकमेव पर्याय जनतेसमोर आहे', अशा आशयाचे पोस्टर्स पुण्यात अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत.
या पोस्टरवर काँग्रेस नेते आणि मागील लोकसभा निवडणूक लढवलेले नेते मोहन जोशी यांचा फोटो ठळकपणे लावण्यात आला आहे. त्यामुळे याद्वारे मोहन जोशी यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढण्यासाठी मैदानात उतरण्यास सज्ज असल्याचे दाखवून दिल्याचे बोलले जात आहे.
मागील लोकसभा निवडणुकीवेळी मोहन जोशी यांचे नाव काँग्रेसकडून आघाडीवर नव्हते, तरी देखील शेवटच्या क्षणी जोशी यांनी दिल्लीतून सूत्र फिरवून उमेदवारी आपल्या नावावर केली होती. त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळाली होती.
यावेळीही मोहन जोशींनी पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी दंड थोपटले आहेत. यामुळे काँग्रेसच्या गोटामध्ये हालचालींना वेग आला आहे. परिणामी लोकसभा उमेदवारीवरून महाविकास आघाडीतच नव्हे तर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद देखील भविष्यात चव्हाट्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(Edited by- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.