

Lonavala News: पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात घडलेल्या एका तरुणाच्या मृत्यूचे गूढ पोलिस तपासानंतर उलगडले आहे. रायफल साफ करताना अचानक गोळी सुटल्याने मृत्यू झाल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते. मात्र, पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून प्रॉपर्टीच्या वादातून झालेला खून असल्याचे समोर आले. या प्रकरणी मृत तरुणाच्या ८३ वर्षीय आजोबांना पोलिसांनी अटक केली आहे.
अभय माणिक मराठे (३३) असे मृत तरुणाचे नाव आहे. ते लोणावळा शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक माणिक मराठे यांचे पुत्र होते. ५ ऑक्टोबर रोजी भुशी गावातील हॉटेल मोतीरामच्या परिसरात ही घटना घडली. गोळी लागल्यानंतर अभय गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर लोणावळा शहर पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती. रायफल हाताळताना अनवधानाने गोळी सुटल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र शवविच्छेदनाच्या वेळी पोलिसांना काही बाबी संशयास्पद वाटल्या. गोळी लागल्याने शरीरावर झालेली जखम आणि गोळीबाराची दिशा यामुळे पोलिसांनी या घटनेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून तपास सुरू केला.
यानंतर हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरसह इतर संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात आली. तपास पुढे जात असताना अभय यांचा मृत्यू अपघाती नसल्याचे स्पष्ट झाले. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि लोणावळा शहर पोलिसांनी केलेल्या तपासात अभय यांच्यावर त्यांचेच आजोबा मोतीराम मराठे यांनी गोळी झाडल्याचे निष्पन्न झाले.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोतीराम मराठे आणि अभय यांच्यात प्रॉपर्टीच्या व्यवहारावरून वाद सुरू होता. ५ ऑक्टोबर रोजीही दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाला. त्यानंतर मोतीराम यांनी त्यांच्या परवानाधारक रायफलमधून अभय यांच्यावर गोळी झाडल्याचा तपासात निष्कर्ष समोर आला. गोळी लागल्याने गंभीर जखमी झालेल्या अभय यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी मोतीराम मराठे यांना अटक केली आहे. घटनेनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवत कुटुंबातील आणखी पाच जणांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागील संपूर्ण प्रकार पोलिस तपासातून समोर आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.