Pune News : फर्ग्युसन कॉलेज रोडवरील 'लिक्विड लिझर लाउंज' (एल 3) या बार हॉटेलमध्ये झालेल्या ड्रग्ज तसेच मद्यपार्टी प्रकारानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने या बारचा परवाना रद्द केला आहे. आता या हॉटेलवर महापालिकेने देखील कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
पालिकेची कोणतीही परवानगी न घेता या हॉटेलमध्ये बदल करण्यात आले होते, त्यामुळे कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे या बार, हॉटेलच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
एफ सी रोडवरील 'एल 3' या बारमध्ये झालेल्या ड्रग्ज तसेच दारू पार्टीचा एका व्हिडीओ सोशल मिडीयावर (Social Media) व्हायरल झाला होता. मध्यरात्रीच्या वेळेस ही पार्टी सुरु असल्याचे समोर आले होते. पार्टीमध्ये आलेले काही युवक, युवती ड्रग्जचे सेवन करत असल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत होते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. पोलिसांना तातडीने घटनास्थळी भेट देत पब मालक, पार्टनर यांच्यासह मॅनेजर, कर्मचारी अशा आठ जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे.
या हॉटेलमध्ये ड्रग्ज (Drugs) ची पार्टी होत असल्याचे समोर आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याची दखल घेत शहरातील बेकायदा पद्धतीने चालविले जाणारे पब आणि बारवर बुलडोझर फिरवा, असे आदेश महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळपासूनच महापालिका प्रशासन अॅक्टिव्ह मोडवर आली आहे. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील बेकायदा पद्धतीने करण्यात आलेले अतिक्रमण, बांधकाम यावर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
यासाठी मोठ्या संख्येने कर्मचारी, अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी ज्या हॉटेलमध्ये ही पार्टी झाली होती, त्या 'एल 3' हॉटेलवर देखील कारवाई केली जाणार असल्याचे पालिकेती अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या हॉटेलला सील लावले होते. ते सील उघडून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तेथे पाहणी केली. त्यानंतर तेथे झालेले अतिक्रमण आणि बेकायदा बांधकाम पाडून टाकले.
दुपारनंतर पालिकेच्या अतिक्रमण विभाग तसेच बांधकाम विभागाच्या पथकांनी एफ सी रोडवर कारवाई सुरू केली होती. यासाठी मोठा फौजफाटा बरोबर घेऊन पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आले होते. अशा प्रकारची घटना झाल्यानंतरच प्रशासनाला बेकायदा बांधकाम, अतिक्रमण दिसते, त्यापूर्वी का दिसत नाही, असा प्रश्न पुणेकरांच्या वतीने विचारला जात आहे. यापूर्वीही या भागात अनेक हॉटेल तसेच बारचालकांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केलेले असल्याचे समोर आले होते. मग त्याचवेळी यावर कारवाई करण्याची हिंमत पालिका प्रशासनाने का नाही दाखविली, असा प्रश्न विचारला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.