

Pune BJP : पुणे महापालिकेचा कार्यकाळ मार्च 2022 मध्ये संपल्यानंतर गेली 3 वर्षे शहरात प्रशासकीय राजवट सुरू आहे. या काळात नागरिकांच्या मूलभूत समस्या जसे की पाणीपुरवठा, मलनि:सारण, रस्ते, वीज आणि आरोग्य सेवा यासाठी लोक प्रतिनिधी नसल्याने तक्रार निवारणात अडथळे निर्माण झाले आहेत. पण पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये माजी माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी उभी केलेली ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ ही यंत्रणा चर्चेचा विषय ठरत आहे.
महापालिकेत नगरसेवक नसल्यामुळे नागरिक आणि प्रशासन यांच्यातील थेट संवाद तुटला असल्याचे चित्र अनेक प्रभागांमध्ये दिसते. हीच पोकळी ओळखून माजी सभागृह नेते आणि सध्या प्रभाग 24 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार गणेश बिडकर यांनी ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ ही समांतर यंत्रणा उभी केली असल्याची माहिती देण्यात आली. नागरिकांचे प्रश्न आणि अडचणी एका फोनवर सोडवणारा 'बिडकर पॅटर्न' चांगलाच गाजत आहे.
‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ कसा कार्यरत आहे?
या उपक्रमांतर्गत 50 हून अधिक कार्यकर्त्यांची टीम तयार करण्यात आली आहे. या टीममधील प्रत्येक गटप्रमुखाकडे पाणीपुरवठा, मलनि:सारण, विद्युत, आरोग्य, वृक्ष प्राधिकरण, अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन अशा महापालिकेच्या विविध विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नागरिकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर तक्रार नोंदवल्यानंतर ही टीम थेट संबंधित महापालिका अधिकाऱ्यांशी समन्वय साधते.
तक्रार केवळ नोंदवण्यापुरती मर्यादित न ठेवता, समस्या सुटेपर्यंत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाठपुरावा केला जातो. गणेश बिडकर यांच्या मतानुसार, नगरसेवक हा नागरिक आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा असतो. प्रशासकीय काळातही ही भूमिका निभावण्याचा प्रयत्न ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’च्या माध्यमातून करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
रास्ता पेठ, सोमवार पेठ आणि मंगळवार पेठ परिसरात वाडे, सोसायट्या आणि झोपडपट्ट्या अशा संमिश्र वस्तीमुळे समस्यांच्या स्वरूपात वेगळेपण आढळते. त्यामुळे केवळ कार्यालयीन पातळीवर नव्हे, तर प्रत्यक्ष मैदानात उपस्थित राहून काम करणे आवश्यक असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित होत असल्याचे स्थानिक सांगतात.
प्रभाग 24 मधील काही नागरिकांच्या मते, रस्ते, फुटपाथ, पथदिवे, सीसीटीव्ही बसवणे, ड्रेनेज चेंबर दुरुस्ती आणि पाणीपुरवठा सुधारणा यांसारखी कामे या यंत्रणेमुळे तुलनेने जलद मार्गी लागली आहेत. काही प्रकरणांमध्ये नागरिकांना थेट बिडकर यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज भासली नसून, प्रभागातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तक्रारी सोडवण्यात आल्याचेही सांगितले जाते. प्रशासकीय राजवटीत लोकप्रतिनिधी नसल्याने निर्माण झालेली दरी ही या उपक्रमाने भरून काढण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र दिसते.
पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’सारख्या उपक्रमांकडे निवडणूक प्रचाराचा भाग म्हणूनही पाहिले जात आहे. मात्र, प्रशासकीय कार्यक्षमता आणि नागरिक सेवा वितरणाच्या दृष्टीने हा मॉडेल शहरी प्रशासनासाठी एक पर्यायी आराखडा ठरू शकतो, असे मत शहर अभ्यासकांकडून व्यक्त केले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.