

BJP News : मुंबईसह राज्यातील महापालिकांवर वर्चस्व मिळवून एक नंबरचा पक्ष होण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये स्पर्धा लागली आहे. कोणी हिंदुत्व सोडले, कोणाचे हिंदुत्व श्रेष्ठ, महापौर मराठी की अमराठी यावरून सुरू असलेला कलगीतुरा रोज सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये 'ना खान, ना बाण राखू भगव्याची शान' असा नवा नारा दिला आहे. संभाजीनगर महापालिकेत भाजप हाच नंबर एकचा पक्ष असेल, असा दावाही त्यांनी केला.
संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टाॅक शोच्या माध्यमातून एकाचवेळी 90 वार्डांशी संवाद साधला. तसेच शहरातील उद्योजक, व्यापारी, डाॅक्टर, वकील आणि निमंत्रित प्रतिष्ठितांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर गेली पंचवीस वर्ष शिवसेना-भाजप या दोन पक्षांची सत्ता होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणाऱ्या पहिल्याच महापालिका निवडणुकीत भाजप आणि महायुतीतील शिवसेना हे दोघे स्वबळावर लढत आहेत.
संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात खान हवा की बाण? हा मुद्दा कायम राहिला आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावरच युतीने महापालिकेवर वर्षानुवर्षे सत्ता गाजवली. या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी चालाखीने उत्तर दिले. आता ना खान, ना बाण, राखू भगव्याची शान म्हणत त्यांनी सूचक संदेश दिला.
यावेळी विचारलेल्या रॅपीड फायर प्रश्नानांही फडणवीस यांनी खुबीने उत्तरे दिली. मराठवाडा की विदर्भ? यावर महाराष्ट्र असे ते म्हणाले. भारत की हिंदूस्थान? या प्रश्नावर अखंड भारत आणि मराठी की हिंदी यावर मराठीच, असे उत्तर देत त्यांनी भाजपची (BJP) राजकीय दिशा आणि भूमिका स्पष्ट केली.
स्थानिक प्रश्नालाही हात..
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 'पाणी प्रश्न' हा सगळ्याच राजकीय पक्षांसाठी कळीचा मुद्दा राहिला आहे. शहरवासियांना दररोज पाणीपुरवठा करण्यासाठीची योजना रखडली आहे. नागरिकांना पाणी कधी मिळणार? या प्रश्नावरही पाणीपुरवठा योजनेची माहिती देतानाच दोन महिन्यात पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
संभाजीनगर महापालिकेतील कारभाराबद्दलही फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. सत्ता आल्यानंतर किंवा तुम्ही महापालिकेचे महापौर झालात, तर काय कराल? असे विचारले असता, या महापालिकेत पारदर्शकताच नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.