

Solapur, 08 January : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट इशारा दिल्यानंतरही उमेदवारी कायम ठेवून बंडखोरी करणाऱ्या 28 जणांवर भारतीय जनता पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एक माजी उपमहापौर, सहा माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वीच बंडखोरांना इशारा दिला होता, त्यानंतरही माघार न घेणाऱ्या 28 कार्यकर्त्यांना भाजपने पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. हे सर्वजण महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
माजी उपमहापौर राजेश काळे, विठ्ठल कोटा, वैभव हत्तुरे, श्रीनिवास करली, डॉ. राजेश अनगिरे या माजी नगरसेवकांसह बाबूराव जमादार, ॲड. शर्वरी रानडे, अमरनाथ बिराजदार, काशिनाथ झाडबुके, निर्मला तट्टे, निर्मला पासकंटी, प्रकाश राठोड, मंजूषा मुंडके, राजशेखर येमूल, राजश्री चव्हाण, राजू आलुरे, राजेश काळे, रुचिरा मासम, रेखा गायकवाड, विजय इप्पाकायल, वीरेश चडचणकर, श्रीनिवास पोतन, श्रीशैल हिरेमठ, सीमा महेश धुळम, स्नेहा विद्यासागर श्रीराम यांच्यावर भाजपने कारवाई केली आहे. याबाबतची माहिती भाजप (BJP) शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी दिली.
सोलापूर (Solapur) महापालिकेच्या १०२ जागांसाठीच्या निवडणुकीत सर्वाधिक इच्छुक हे भाजपकडे होते. तब्बल ८०० हून कार्यकर्त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढविण्याची इच्छा भाजपकडे व्यक्त केली होती. मात्र, भाजपकडे या वेळी इच्छूकांची संख्या मोठी होती. त्यामुळे उमेदवारीसाठी भाजपकडे सर्वाधिक चुरस दिसून येत होती.
निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली आहे. काहींनी अन्य पक्षाकडून निवडणूक लढविणे पसंत केले आहे, तर काहींनी पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत. भाजपचे हे बंडखोर मातब्बर आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा फटका भाजप उमेदवाराला बसण्याची शक्यता जास्त होती.
तो धोका ओळखून सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बंडखोरांना इशारा दिला होता. स्वीकृत नगरसेवक आणि इतर ठिकाणी संधी देण्यात येईल. त्यामुळे भाजपच्या बंडखोरांनी आपली उमेदवारी मागे घेऊन पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा द्यावा; अन्यथा दोन दिवसांत मला कारवाई करावी लागेल, असा इशारा चव्हाण यांनी दिला होता. त्यानंतरही बंडखोरांनी आपली उमेदवारी कायम ठेवली होती. त्यांच्यावर भाजपकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
अगोदर परवानगी दिली; नंतर निलंबनाची कारवाई
आमदार सुभाष देशमुख यांनी प्रभाग २२ मधून शीतल गायकवाड यांना शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांची परवानगी घेऊन उमेदवारी जाहीर केली होती. देशमुख यांनी अनेकदा ते जाहीरपणे सांगितले आहे. त्याचे खंडन तडवळकर यांनी अद्याप केलेले नाही. मात्र, राष्ट्रवादीचे किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांना भाजपत प्रवेश देण्यात आला. त्यानंतर जाधव आणि गायकवाड यांच्या पत्नी अंबिका गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. शीतल आणि विशाल गायकवाड हे निवडणुकीच्या रिंगणात राहणार नाहीत, याची काळजी भाजपने घेतली. पण विशाल गायकवाड यांच्या पत्नी रश्मी यांची उमेदवारी प्रभाग २४ मध्ये कायम आहे. खुद्द शहराध्यक्षांनी आधी परवानगी देऊन नंतर शीतल गायकवाड यांच्यासह विशाल आणि रश्मी गायकवाड या दांपत्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
समजूत काढून न ऐकल्याने कारवाई : शहराध्यक्षा
महापालिकेच्या एकूण जागेपेक्षा भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी होती. उमेदवारी न मिळाल्याने काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली, तर काहींनी पक्षविरोधी कारवाया केल्या होत्या. त्यांची समजूत काढण्याचे काम सुरू होते. मात्र, पक्षशिस्त न जुमानता काही बंडखोरी, तर काहींनी इतर पक्षांकडून उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावा लागली, असे सोलापूर भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.