PMC Election 2025: अजितदादांवर मुरलीअण्णा ठरले भारी! दोनवेळा सांगून जे भाजपला पाहिजे तेच केले
Pune News: पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभागरचनेत काही बदल करून ही अंतिम रचना निश्चित करण्यात आली. प्रारूप रचना जाहीर झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाने (भाजप) ही रचना स्वतःच्या सोयीनुसार तयार केल्याचा आरोप केला होता.
यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे दादांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अंतिम प्रभाग रचनेमध्ये भाजप करेल असं वाटत होतं मात्र तसं चित्र सध्या पाहायला मिळत नाही.
अंतिम प्रभाग रचनेत हडपसर, खडकवासला आणि वडगाव शेरी या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असलेल्या विधानसभा मतदारसंघांतील काही प्रभागांमध्ये किरकोळ बदल करण्यात आले. मात्र, हे बदल केवळ दिखाव्यासाठी केल्याची चर्चा आहे, कारण यामुळे राष्ट्रवादीला फारसा फायदा झालेला नाही, तर भाजपलाच अधिक लाभ मिळाल्याचे दिसते.
2017 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना मोठे मताधिक्य मिळालेल्या काही भागांचे विभाजन करून ते इतर प्रभागांना जोडण्यात आले आहेत. ज्यामुळे या दोन्ही पक्षांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचे बोलले जाते.
यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर हरकती आणि सूचनांचा विचार करून हडपसर, खडकवासला आणि वडगाव शेरी या मतदारसंघांतील काही प्रभागांमध्ये बदल करण्यात आले. पण हे बदल राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजपच्या फायद्याचे ठरत असल्याचे चित्र आहे.
वडगाव शेरी, हडपसर आणि खडकवासला या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांमध्येच त्यांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. उदाहरणार्थ, माजी महापौर दत्ता धनकवडे यांचा प्रभाव असलेला भाग पाच प्रभागांमध्ये विभागला गेल्याने त्यांना निवडणूक लढवण्यासाठी प्रभाग निवडीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रभागातील टिंगरेनगर गल्ली क्रमांक 14 आणि बार्माशेल झोपडपट्टी हे भाग काढून विमाननगर प्रभागाला जोडण्यात आले. यामुळे टिंगरे यांच्या प्रभागाची निवडणूक लढवण्याची ताकद कमी झाली आहे, तर त्यांचे विरोधक मुळीक आणि पठारे यांच्यासाठी प्रभाग अधिक सुरक्षित झाल्याचे दिसते. याचप्रमाणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या इच्छुक उमेदवारांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सत्तेत असूनही प्रभागरचनेत अपेक्षित फायदा न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. याबाबत पक्षाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर पवार यांनी कार्यकर्त्यांना नाराजी सोडून निवडणुकीची तयारी करण्याचे निर्देश दिले. पवार यांनी यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करताना प्रभागरचना प्रक्रियेत विश्वासात घेण्याचे आश्वासन मिळाल्याचे सांगितले होते.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रभागरचना स्वतःच्या पद्धतीने केल्याचा आरोप पवार यांनी केला आणि त्यांची तुलना माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्याशी केली. यामुळे पुढील काळात पवार आणि मोहोळ यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी अंतिम प्रभागरचनेत काही बदल अपेक्षित होते, पण त्यातून राष्ट्रवादीला फारसा लाभ झालेला नाही, असे दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.