

Pune News : आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. असं असलं तरी मुंबई महानगरपालिकेमध्ये काही अतिरिक्त जागा भाजपला मिळाव्यात यासाठी पुणे शहरातील काही जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सोडल्या जाऊ शकतात. त्यामुळे पुण्यामध्ये काही प्रमाणात शिंदेंच्या सेनेसोबत भाजपची युतीची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र, सध्या शिंदेच्या सेनेत भाजपसोबतच्या युतीवरून अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. भाजपसोबत जायचं का नाही यावरून दोन वेगळे मतप्रवाह तयार झाले आहेत. शहराध्यक्ष नाना भानगिरे हे युतीसाठी अनुकूल असून महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेत स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहेत.
राज्यात पुणे, मुंबई, ठाणे आणि कोल्हापूर यांच्यासह एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. या संदर्भात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात महायुतीत एकत्र निवडणूक लढण्याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असून शिवसेनेच्या (शिंदे गट) स्थानिक नेत्यांनी शहरातील विजयी होऊ शकतील अशा 30 ते 35 महत्त्वाच्या जागांची यादी वरिष्ठ नेत्यांकडे सादर केली आहे. तरीही, या युतीच्या धोरणावर स्थानिक पातळीवर पूर्ण एकमत दिसत नाही.
महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी अलिकडेच घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपबरोबरच्या युतीबाबत तितके सकारात्मक दिसले नाही. ते म्हणाले, "भाजपकडून आम्हाला फक्त 30 ते 35 जागाच दिल्या जाणार असतील, तर ते आम्हाला अमान्य आहे. आम्ही अधिक जागांची अपेक्षा करतो; अन्यथा पुणे महापालिकेतील सर्व जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार उतरवून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहोत. शहर प्रमुख नाना भानगिरे युतीच्या बाजूने प्रयत्न करत असतानाच धंगेकरांच्या या भूमिकेमुळे महायुतीत अडथळा निर्माण झाला आहे.
वास्तविक पाहता, 2017 च्या महापालिका निवडणुकीत अविभाजित शिवसेनेकडून 10 नगरसेवक विजयी झाले होते. त्यापैकी 5 जणांनी नंतर भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला, तर 3 आजही उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेत आहेत. शिंदे गटाकडे भानगिरे यांच्यासह फारसे प्रभावी नगरसेवक नसल्याने शहरातील पक्षाची स्थिती कमकुवत दिसते, अशा स्थितीत भाजपशी युती करणे शिंदे गटाच्या शिवसेनेला लाभदायक ठरू शकते. तरीही धंगेकर 35 पेक्षा अधिक जागांवर ठाम राहिले तर युती धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.
शहराध्यक्ष आणि महानगरप्रमुख यांच्यातील मतभेदांमुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला असला, तरी युतीचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटातील हा अंतर्गत वाद कुठल्या दिशेने वळण घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.