

Pune News : आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेण्याचा निर्णय घेतला असला तरी शिंदे सेनेला जागा सोडण्यामध्ये भाजप आखडता हात घेताना दिसत आहे. दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या पहिल्या बैठकीमध्ये अवघ्या तीन जागांवर चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठीचा युतीचा प्रस्ताव शिवसेनेने भाजपसमोर ठेवला आहे. यामध्ये पहिल्या शिंदेंच्या सेनेकडून 33 जागांची मागणी केली असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता पुन्हा एकदा फेर प्रस्ताव भाजपला देण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सेनेमध्ये पुण्यातील काही माजी नगरसेवकांनी पक्ष प्रवेश केला आहे. त्यामध्ये माजी महापौर आबा बागुल आणि वैशाली मराठे यांचा समावेश आहे. त्यामुळे आता युतीमध्ये शिंदे सेनेने 41 जागांची मागणी केली असल्याचे सांगितले जात आहे.
युती करण्यासाठी झालेल्या प्राथमिक बैठकीमध्ये भाजपच्या (BJP) नेत्यांनी अवघ्या तीन जागांवर चर्चा केल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये सेनेचे शहर प्रमुख असलेले नाना भानगिरे यांची एक जागा, महानगर प्रमुख असलेल्या रवींद्र धंगेकर यांची एक जागा आणि कात्रजमधील माजी नगरसेवक बाबर यांच्या एक जागेवर चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, शिंदेंच्या शिवसेनेकडून मागील महापालिका निवडणुकीमध्ये एक संध शिवसेने जिंकलेल्या त्या दहा जागा मागितल्या आहेत. त्यासोबतच ज्या ठिकाणी गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना जिंकली होती. त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना एक अतिरिक्त जागा हवी आहे. त्यासोबतच शाखाप्रमुख, उपशहर प्रमुख आणि इतर मोठे अधिकाऱ्यांच्या वास्तव्य असलेल्या प्रभागामध्ये काही जागांवर देखील शिंदेंच्या शिवसेनेने दावा केला आहे.
हे सर्व दावे भाजपच्या नेत्यांनी खोडले असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या निवडणुकीमध्ये जे दहा नगरसेवक शिवसेनेकडून निवडणूक जिंकले होते. त्यातील पाच नगरसेवक हे आता भाजपमध्ये आहेत. तसेच इतर चार नगरसेवक हे ठाकरेंच्या सेनेमध्ये आहेत. त्यामुळे फक्त एकच नगरसेवक हा शिंदेंच्या सेनेमध्ये असल्याने त्या समीकरणानुसार फक्त एकच जागा शिंदे सेनेला सोडण्याची तयारी भाजपने दर्शवली असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार भाजप कोणत्याही परिस्थितीत शिंदे सेनेला 10 पेक्षा अधिक जागा सोडण्याच्या मानसिकतेत नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, रविवारी दोन्ही पक्षांमध्ये दुसरी बैठक होणार होती. मात्र दोन्हीकडचे नेते यावेळी उपलब्ध नसल्याने ही बैठक आता पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे इतक्या कमी जागांवर शिंदेंची सेना मान्य करणार का? आणि पुण्यात भाजप आणि शिवसेनेचे युतीचे काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.