Pune News, 19 Sep : आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाच्या वाटाघाटी सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मित्र पक्षांमध्ये सुरू आहेत. असं असलं तरी काही मतदारसंघांबाबत ठोकताळे बांधले जात आहेत.
त्यानुसार पुण्यातील (Pune) कोथरूड विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपकडे राहील हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सुटण्याची दाट शक्यता आहे.
कोथरूड (Kothrud) विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणआर असल्याचं बोललं जात आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघांमधून चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तत्कालीन आघाडीने आपला उमेदवार उतरवला नव्हता.
त्यावेळी मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना त्यांनी पाठिंबा दर्शवला होता. त्यावेळी शिवसेनेकडून इच्छुकांची मोठी संख्या होती. मात्र, हा मतदारसंघ जागावाटपात भाजपच्या वाट्याला आल्याने इच्छुकांच्या पदरी निराशा आली. मात्र, यंदा त्यांना अपुरी इच्छा पूर्ण करण्याची संधी आहे.
राज्यातील राजकीय चित्र बदलले आहे. शिवसेनेचे (Shivsena) दोन भाग झाले असून कोथरूडमधील बहुतांश नेते हे ठाकरेंच्या सेनेसोबत आहेत. यंदाच्या निवडणुकीत ठाकरेंची सेना ही आघाडीसोबत आहे. हा मतदारसंघ आघाडीत ठाकरे गटाला मिळण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे तीन मातब्बर नेते निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत . त्यामध्ये महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि ठाकरे सेनेचे पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे यांचा समावेश आहे. तिन्ही नेत्यांनी आपापल्या परीने वरिष्ठांकडे फिल्डिंग लावली असून आपल्या पातळीवर निवडणुकीची तयारी करण्यास सुरुवात देखील केली आहे.
अस असलं तरी शिवसेना ठाकरे गटामध्ये मातोश्रीवरून येणारा आदेश महत्त्वाचा मानला जातो. मातोश्रीवरून जो निर्णय येईल तो आपल्याला मान्य असेल असं तिन्ही नेते सांगताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मातोश्रीचा निर्णय कोणत्या नेत्याच्या पारड्यात पडणार हे पाहावं लागेल.
महाविकास आघाडीतील इतर पक्षांमध्ये कोथरूडमधून निवडणूक लढण्यास तितकी उत्सुकता दिसत नाही. या मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसकडे (Congress) अवघा एक इच्छुक अर्ज आला आहे. संदीप मोकाटे या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून या मतदारसंघांमधून तीन इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
यामध्ये किशोर कांबळे, संदीप बालवडकर आणि स्वप्निल दुधाने यांचा समावेश आहे. मात्र यामध्ये कोणतंही मोठं नाव पाहायला मिळत नाही त्यामुळे या मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतील दोन्ही पक्ष जागा वाटपामध्ये जोर लावतील याची शक्यता जवळपास न च्या बरोबर दिसत आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मोकाटे, सुतार अथवा गजानन थरकुडे यांच्यापैकी एक चेहरा येण्याची दाट शक्यता आहे.
सध्या भाजपमधून एक माजी नगरसेवक या मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे. कोणत्याही परिस्थितीत आगामी कोथरूड विधानसभेचे निवडणूक लढायची असाच त्यांनी चंग बांधला आहे. त्यामुळे भाजपमधून इनकमिंग होऊन शिवसेना ठाकरे गट या मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्याबाबतच्या प्राथमिक चर्चा देखील सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.