

Pune Police Reply to Supriya Sule: पुणे शहर 'क्राईम कॅपिटल' झाले असून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असल्याचं सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी सातत्यपूर्ण टीका केली आहे. पण यावर आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आकडेवारीसह सुळेंना उत्तर दिलं आहे. पुण्यात गुन्हेगारी वाढलेली नसून उलट सर्व प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाली असल्याचं आयुक्तांनी सुळेंना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे या पत्राची प्रत पुण्यातील महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांसह मंत्र्यांना पोलिसांकडून पाठवण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तांच्या पत्रानुसार, सन २०२३च्या तुलनेत २०२४ मध्ये आणि २०२४च्या तुलनेत २०२५ मध्ये शहरातील गुन्ह्यांमध्ये घट झाली असून २०२६ मध्येही हाच कल कायम आहे. २०२५ च्या तुलनेत २०२६ च्या याच कालावधीचा विचार केल्यास साखळी चोरीत ५६%, जबरी चोरीत ३६%, वाहन चोरीत २८%, चोरीत २४%, घरफोडीत १४%, आणि खून व खुनाच्या प्रयत्नात १०.५% ची घट झाली आहे. तसेच दुखापतीच्या गुन्ह्यात ३% आणि वाहनांच्या तोडफोडीच्या घटनांमध्ये ५०% पेक्षा जास्त घट नोंदवली गेली आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या देशातील १९ महानगरांच्या अहवालानुसार, दखलपात्र गुन्ह्यांच्या प्रमाणात पुणे शहर १८ व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच पुण्यापेक्षा फक्त १ शहर चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे पुणे 'गुन्हेगारीची राजधानी' आहे असे म्हणणे पूर्णपणे वस्तुस्थितीहीन आहे, उलट पुणे हे एक सुरक्षित शहर आहे, असे आयुक्तांनी म्हटले आहे.
महिलांची सुरक्षितता हा पुणे पोलिसांचा सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचे सांगत आयुक्तांनी स्पष्ट केले की, २०२६ मध्ये बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये अनुक्रमे ७% आणि १% घट झाली आहे. तसेच बेपत्ता होणाऱ्या अल्पवयीन मुले व मुलींचा शोध घेण्यामध्ये पुणे पोलिसांची कामगिरी ९७% पेक्षा जास्त असून हे प्रमाण असाधारण आहे, तर बेपत्ता होण्याची बहुतेक सर्व प्रकरणे ही प्रेमसंबंधातून उद्भवलेली असल्याचे तपासात समोर आले आहे.
सोशल मीडिया आणि संभाषणात प्रचलित असलेल्या 'कोयता गँग' या शब्दाबाबत खुलासा करताना त्यांनी सांगितले की, पुण्यात अशी कोणतीही विशिष्ट 'कोयता टोळी' अस्तित्वात नाही. वेगवेगळ्या शारीरिक गुन्ह्यांमध्ये धारदार शस्त्रांचा वापर होतो, त्याला सोशल मीडियावर कोयता गँगचे हल्ले म्हटले जाते, परंतू पोलिसांच्या उपाययोजनांमुळे अशा घटनांमध्ये मोठी घट झाली आहे.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आंदोलनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७(१)(३) अंतर्गत नेहमीप्रमाणे एक नियमित अधिसूचना जारी करण्यात आली होती, परंतू सोशल मीडियावर याला चुकीच्या पद्धतीने 'लॉकडाऊन' असे नाव देऊन अफवा पसरवण्यात आली. तसेच, रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर चालणाऱ्या पानटपऱ्या आणि फूड स्टॉल्समुळे समाजकंटकांची गर्दी होत असल्याने सार्वजनिक शांततेसाठी ते रात्री १० वाजता बंद करण्याचे आदेश दिले आहेत. फेरिवाल्यांच्या परवान्यात आधीपासूनच रात्री १० वाजेची अट असल्याने हा कोणताही नवीन नियम नाही.
संघटित गुन्हेगारीवर बोलताना आयुक्त म्हणाले की, प्रमुख गुन्हेगारी टोळ्यांवर 'मोक्का' अंतर्गत कारवाई करून त्यांना तुरुंगात पाठवले आहे आणि गेल्या ६ महिन्यांत टोळीशी संबंधित केवळ एक घटना घडली असून, त्यातील सर्व ६ आरोपींना १० तासांच्या आत अटक करून मोक्का लावण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत गेल्या २ वर्षांत ५०० ड्रग्ज तस्करांवर गुन्हे नोंदवून २० कोटींचे अंमलीपदार्थ जप्त केले, तर २०२४ मध्ये एका आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करून ३,७०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करून नष्ट केले आहे, जी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.
शहराच्या टेकड्या आणि घाटांवर सुरक्षिततेसाठी एआयवर आधारित सीसीटीव्ही, फ्लड लाईट्स आणि इमर्जन्सी कॉल बॉक्सेस बसवण्यासाठी शासनाने ८० कोटी रुपये मंजूर केले आहेत. तसेच आणीबाणीच्या प्रसंगी 'डायल ११२'चा पोलिसांचा प्रतिसाद वेळ सुमारे ८ मिनिटांवर आला असून 'ड्रंक अँड ड्राईव्ह' अंतर्गत गेल्या २ वर्षात १७,००० चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
शेवटी पोलीस आयुक्तांनी पत्रात खंत व्यक्त केली की, सोशल मीडियावरील चुकीच्या आकडेवारीमुळे आणि नकारात्मक वातावरणामुळे नागरिकांमध्ये अविश्वासाचे व असुरक्षिततेचे वातावरण तयार होते, ज्या कायदेशीर कारवाई कमकुवत करण्यासाठी समाजकंटक फायदा घेतात. आम्ही विधायक टीकेचे स्वागत करतो, पण वस्तुस्थितीहीन टीकेमुळे सुमारे ९,००० पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचे मनोधैर्य खच्ची होते. पुणे हे शिक्षण आणि आयटी हब असून ते गुंतवणुकीसाठी सुरक्षित राहील यासाठी पोलीस कटिबद्ध आहेत, त्यामुळे नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी व्यवस्थेवर विश्वास ठेवून सहकार्य करावे, अशी विनंती आयुक्तांनी केली आहे. या पत्राच्या प्रती पालकमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि पुण्यातील सर्व आमदारांना माहितीसाठी सादर करण्यात आल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.