Pune News : शहरातील मध्यवर्ती पेठांचा भाग अशी ओळख असलेल्या रविवार पेठेतील सराफी बाजारातून तीन कोटी 32 लाख रूपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. यामध्ये पाच किलो सोने, दहा लाख 93 हजार रूपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे. कसबा विधानसभेचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या जवळच ही घटना घडली. यामुळे सराफ बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये रास्ता पेठेत राहत असलेले दीपक माने यांनी तक्रार दिली आहे. रविवार पेठेत माने यांची राज कास्टिंग पेढी आहे. या पेढीत दागिने घडवून त्याची विक्री सराफ बाजारातील पेढींना केली जाते. राज कास्टिंगजवळ कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांचे जनसंपर्क कार्यालय आहे.
तक्रारदार माने नवीन वर्षाच्या गडबडीत होते. त्यांनी पेढीमध्ये दहा लाख 93 हजार रूपयांची रोकड तसेच पाच किलो सोने ठेवले होते. रविवारी रात्री ही चोरी झाली. सोमवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर दुकानात चोरी झाल्याचे तक्रारदार माने यांच्या लक्षात आले. सराफ पेढीमध्ये कामाला असलेल्या कारागिरांनी दागिने आणि रोख रक्कम चोरल्याचा संशय माने यांनी दिलेल्या तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी 31 डिसेंबरला मध्यरात्री कारागिरांनी संगनमत करून पेढीतील सोने, रोकड असा तीन कोटी 32 लाख 9 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचे माने यांच्या लक्षात आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, सहायक निरीक्षक वैभव गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. सहायक निरीक्षक वैभव गायकवाड तपास करत आहे.
सराफ बाजारात झालेल्या चोरींच्या घटनांमध्ये दुकानात काम करणारे कारागिरच चोरी करून पुण्याबाहेर पोबारा करत असल्याचे सिद्ध झालेले आहे. यापूर्वी देखील काही घटनांमध्ये मालकाचा विश्वास संपादन करून अशा पद्धतीने चोऱ्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. कारागिरांना दुकानाची संपूर्ण माहिती असल्याने नक्की कोणत्यावेळी मालक येणार नाही, याचे संपूर्ण नियोजन करून या चोऱ्या केल्या जात असल्याचे यापूर्वीच्या घटनांवरून समोर आले आहे.
Edited by : Chaitanya Machale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.