

Pune News : पुणे शहरात सतत वाढणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी शस्त्र पुरवठा रॅकेटच्या थेट मुळापर्यंत पोहोचून मोठी कारवाई केली आहे. शहरात अल्पवयीन गुंडांपर्यंत पोहोचणाऱ्या अवैध पिस्तुलांचा पुरवठा मध्य प्रदेशातून होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी थेट मध्यप्रदेशमध्ये जाऊन ४ अवैध बंदूक निर्मिती कारखाने पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहेत.
गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने गुरुवारी मध्यरात्रीनंतर मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील उमरती गावात ही कारवाई केली. उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली १०५ हून अधिक पोलिसांचे पथक या मोहिमेत सहभागी होते. गावात वेगवेगळ्या ठिकाणी चालणारे चार वेगवेगळे अवैध कारखाने पोलिसांना आढळले, जे ताबडतोब जमीनदोस्त करण्यात आले.
या कारवाईत पोलिसांनी १०० पेक्षा जास्त गन बॅरल, ५ मॅगझिन, १४ ग्राइंडिंग मशीन्स, दोन तयार पिस्तुले आणि चार काडतुसे जप्त केली. तसेच या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या ४७ व्यक्तींना घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले. हे सर्वजण दीर्घकाळापासून अवैध शस्त्र निर्मितीच्या रॅकेटमध्ये सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय आहे.
मागील काही महिन्यांपासून पुण्यात अल्पवयीन गुन्हेगारांकडे आढळून येणाऱ्या पिस्तुलांचा तपास करताना ही साखळी मध्य प्रदेशापर्यंत पोहोचली. त्यानंतर पुणे पोलिसांनी तात्काळ विशेष पथक तयार करून राज्याबाहेर जाऊन ही धडक कारवाई केली.
सध्या परिसराची सखोल झडती आणि जप्त साहित्याचा तपास सुरू आहे. पुणे शहरातील अवैध शस्त्रांचा पुरवठा खंडित करण्यात ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे पोलिसांनी (Pune Police) सांगितले. या धाडसी मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.