Pune News : पुणे शहर परिसरात येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर दोन विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार महायुतीने निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. या आठपैकी सात विधानसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्याने भाजपमधील इच्छुक नाराज होते.
पाच विधानसभा मतदारसंघातील नाराज नेत्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरी जाऊन भेट घेत बंद दाराआड चर्चा केली. नाराजांचा रुसवा दूर केला. मात्र दोन विधानसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांनी नाराजांची मनधरणी करणे टाळलं असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौऱ्या दरम्यान सर्वप्रथम शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील नाराज असणाऱ्या सनी निम्हण यांची घरी जाऊन भेट घेतली. सनी निम्हण हे भाजपसोबतच काँग्रेसकडून तिकीट मिळावं यासाठी प्रयत्नशील होते. मात्र भाजपने पुन्हा एकदा विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना निवडणूक रिंगणात उतरवल्याने सनी निम्हण त्यांची नाराजी फडणवीसंनी दूर केल्याचे बोलले जात आहे.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली. सोबतच पर्वती विधानसभा मतदारसंघातील नाराज असलेले भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले आणि माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांची देखील फडणवीस यांनी भेट घेत नाराजी दूर केली.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा सुनील कांबळे यांना निवडणूक रिंगणात उतरवल्याने भाजपचे भरत वैरागे नाराज होते त्यांनी अपक्ष अर्ज देखील दाखल केला होता. फडणवीस यांनी भेट घेतल्यानंतर भरत वैरागे यांनी अर्ज माघारी घेण्याची तयारी दर्शवली आहे.
पुणे दौऱ्याची शेवट देवेंद्र फडणवीस यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार जगदीश मुळीक यांची नाराजी दूर करून केला. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून मुळीक हे निवडणूक लढण्यास इच्छुक होते, त्यांना भाजपने एबी फॉर्म देखील दिला होता. मात्र हा मतदारसंघ अजित पवारांना सुटल्याने ऐनवेळी जगदीश मुळीक यांना माघार घ्यावी लागली होती. त्यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांनी बंद दारावर चर्चा करून निवडणूक प्रचारात ऍक्टिव्ह होण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
या नाराज नेत्यांसोबतच भाजप नेते संजय काकडे यांचे देखील यांचे देखील फडणवीस यांनी भेट घेतली. दरम्यानच्या काळामध्ये संजय काकडे पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पाच विधानसभा मतदारसंघांना भेट दिली. सहावा विधानसभा मतदारसंघ हा हडपसर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात भाजपकडून कोणताही नेता इच्छुक नव्हता आणि नाराजी नव्हता. मात्र त्याखेरीस कोथरूड आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप अंतर्गत नाराजी होती.
खडकवाल्यामधील विद्यमान आमदारांना स्थानिक भाजप नेत्यांनी जोरदार विरोध केला होता. नगरसेविका मंजुषा नागपूरे, माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, प्रसन्न जगताप यासारखे नेते निवडणूक लढण्यास इच्छुक होते. तिकीट नाकारल्याने ते नाराज हि होते. मात्र या नेत्यांना भेट देणं फडणवीस यांनी टाळलं असल्याचे बोलले जात आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातून अमोल बालवडकर यांनी बंडाचे निशाण फडकवलं होतं काही दिवसांपूर्वी त्यांचे बंड शांत करण्यात भाजपाला यश आलं असलं तरी त्यांची देखील भेट घेणं देवेंद्र फडणवीस यांनी टाळल्याचे पाहायला मिळालं या नेत्यांशी मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी संपर्क केला असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्ष भेट मात्र या दोन विधानसभा मतदारसंघातील नाराजांना देणे टाळल्याने चर्चांना उधाण आला आहे.
Edited by: Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.