

PMC Election News : पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडून दखल घेतली जात नसल्याने शिवसेनेने स्वतंत्र लढावे असा प्रस्ताव शिवसेनेच्या नाराज कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. शिवसेनेच्या नाराज कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री मुंबईमध्ये शिंदे यांची भेट घेतली. यात स्वबळावर लढावे, अशी मागणी केली. मित्र पक्षातील नाराजी बघून शहर भाजप काय निर्णय घेणार, याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.
पुणे महापालिका निवडणूक भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी शहर पातळीवरील दोन्ही पक्षांच्या नेत्यांची प्राथमिक बैठक पार पडली. त्यानंतर युती आणि जागा वाटपाच्या चर्चेसाठी अद्यापही एकही बैठक झालेली नाही. भाजप विश्वासात घेतही नाही आणि बाहेरून शिवसेनेत प्रवेश करू पाहणाऱ्यांनाही येऊ देत नाही, अशा कात्रीत शहर शिवसेना अडकली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्था वाढली आहे.
शिवाय पक्षाचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर हे बैठकीसाठी असतील, तर चर्चा होणार नाही. ते सोडून चर्चा करू, असा हट्ट भाजपच्या शहरातील नेत्यांकडून धरला जात आहे. ते असतील तर जास्तीत जास्त नऊ ते 10 जागा देऊ, असे निरोप शिवसेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांना भाजपकडून निरोप दिले जात आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, त्याशिवाय शहरात पक्ष कसा वाढणार, असे रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचे म्हणणे आहे. परंतु शहर पातळीवरील पक्षाचे अन्य नेते स्वत:च्या दोन-चार जणांचे हित पाहण्यापलीकडे विचार करण्यास तयार नाही.
भाजपकडून (BJP) मिळणाऱ्या वागणुकीबाबत शहर पातळीवर नेत्यांनी पुढाकार घेऊन वरिष्ठांशी बोलून ठोस निर्णय घेण्याची गरज आहे, मात्र तसेही होताना दिसत नाही. त्यामुळे पक्षात मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचे सूत्रांनी सांगितले. अखेर कार्यकर्त्यांनी एकत्र येत पक्षाच्या नेत्यांना भेटून आपल्या भावना त्यांच्या कानावर घालण्यासाठी बुधवारी मुंबई गाठली. यानंतर आता एकनाथ शिंदे कशी दखल घेणार आणि पुढे काय निर्णय होणार? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.