

Pune News : आगामी पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे वेध लागले असतानाच महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीने (टीडीएफ) निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. टीडीएफच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी ‘उमेदवार हा मूळ शिक्षकच असला पाहिजे’, अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली. ही भूमिका आता राजकीय पक्षांसाठी मोठा आव्हान करणार असल्याचे बोलले जात आहे.
पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची विधान परिषद निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबर २०२६ मध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांचे प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्यासाठी सक्षम उमेदवार देण्याच्या दृष्टीने टीडीएफकडून इच्छुक उमेदवारांची भूमिका जाणून घेतली जात आहे.
गेल्या सहा वर्षांत शिक्षक आमदारांकडून शिक्षकांचे मूलभूत प्रश्न प्रभावीपणे मांडले गेले नाहीत, असा आरोप टीडीएफने केला. जुनी पेन्शन योजना, संच मान्यता, अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा यांसारखे प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचा दावा संघटनेने केला.
शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आता केवळ आश्वासन देणारा नव्हे, तर प्रत्यक्ष शिक्षण क्षेत्राचा अनुभव असलेला आणि शिक्षकांच्या प्रश्नांची जाणीव असलेला लोकप्रतिनिधी आवश्यक असल्याचे टीडीएफने स्पष्ट केले.
शिक्षकांवर शैक्षणिक कामांसोबतच मोठ्या प्रमाणात अशैक्षणिक आणि प्रशासकीय कामांची जबाबदारी सोपविली जात असल्याचा मुद्दा संघटनेने उपस्थित केला. ‘सरकारने शिक्षकाचा कारकून केला आहे,’ अशी टीका करत शिक्षकांना अध्यापनाच्या मूळ कामाकडे लक्ष देता यावे, अशी मागणी करण्यात आली.
शाळेतील अध्यापन सोडून विविध शासकीय कामे, सर्वेक्षणे आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये शिक्षकांचा वेळ जात असल्याने त्याचा थेट परिणाम शिक्षण व्यवस्थेवर होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
विधान परिषदेत शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारा आमदार हा शिक्षण क्षेत्राशी थेट निगडित असावा, अशी टीडीएफची भूमिका आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत संघटना स्वतःचा उमेदवार देण्याच्या तयारीत असून, ‘उमेदवार शिक्षकच हवा’ या भूमिकेवर संघटना ठाम आहे.
‘आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आता दुसऱ्यांवर विसंबून राहण्याची वेळ नाही. दमदार आणि कामदार शिक्षक आमदाराची गरज आहे,’ अशी भूमिका टीडीएफचे अध्यक्ष जे. के. थोरात आणि के. एस. डोमसे यांनी बैठकीत मांडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.