

Teacher Recruitment News: राज्यात शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या डी.एड. आणि बी.एड. पात्र उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शालेय शिक्षण विभागाने ‘पवित्र’ (Pavitra) पोर्टलद्वारे राज्यातील तब्बल 30,209 शिक्षक पदांच्या मेगाभरतीला सुरुवात केली आहे.
या भरती प्रक्रियेत स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शाळा, आदिवासी विकास विभाग आणि शासकीय विद्यानिकेतनांमधील रिक्त पदांचा समावेश असून, गुणवत्ताधारित आणि पारदर्शक पद्धतीने नियुक्त्या केल्या जाणार आहेत.
पात्र उमेदवारांना 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2026 या कालावधीत ‘पवित्र’ पोर्टलवर लॉगिन करून पदनिहाय पसंतीक्रम (Preference Order) नोंदवून तो ‘लॉक’ करणे अनिवार्य आहे. निर्धारित मुदतीत पसंतीक्रम लॉक न करणाऱ्या उमेदवारांना पुढील प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात, असे शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी सांगितले.
टीएआयटी-2025 परीक्षेसाठी राज्यभरातून 2,11,308 उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी 1,70,108 उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र (Self-Certificate) प्रक्रिया पूर्ण केली आहे. हे सर्व उमेदवार शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होण्यास पात्र ठरले आहेत. आता या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार आणि पसंतीक्रमानुसार नियुक्तीची संधी मिळणार आहे.
या मेगाभरतीत विविध विभागांतील एकूण 30,209 पदांचा समावेश करण्यात आला आहे.
* जिल्हा परिषद – 13,351 पदे
* खाजगी संस्थांच्या शाळा – 12,148 पदे
* आदिवासी विकास विभाग – 2,421 पदे
* महानगरपालिका – 1,954 पदे
* नगरपालिका व नगरपरिषद – 280 पदे
* शासकीय विद्यानिकेतने – 56 पदे
भरती प्रक्रियेत मोठा दिलासा म्हणजे बहुतांश पदांसाठी मुलाखत घेण्यात येणार नाही. एकूण 19,881 पदांवर केवळ गुणवत्ता आणि नियमानुसार थेट नियुक्ती केली जाणार आहे. उर्वरित 10,328 पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
यामुळे गुणवत्ताधारित आणि अधिक पारदर्शक भरती प्रक्रियेला चालना मिळणार असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
भरतीसाठी उपलब्ध पदांचे इयत्तानिहाय वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे
* इयत्ता 1 ली ते 5 वी- 14,320 पदे
* इयत्ता 6 वी ते 8 वी- 10,012 पदे
* इयत्ता 9 वी ते 10 वी – 5,513 पदे
* इयत्ता 11 वी ते 12 वी – 364 पदे
यामुळे प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तरावर सर्वाधिक शिक्षकांची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.
शिक्षण विभागाने उमेदवारांना वेळेत पसंतीक्रम नोंदवून तो अंतिम स्वरूपात ‘लॉक’ करण्याचे आवाहन केले आहे. पसंतीक्रम नोंदविताना जिल्हा, संस्था, शाळा आणि पदांचा काळजीपूर्वक विचार करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. एकदा पसंतीक्रम लॉक केल्यानंतर त्यात बदल करता येणार नसल्याने उमेदवारांनी सर्व पर्याय तपासूनच अंतिम निर्णय घ्यावा.
गेल्या काही वर्षांत शिक्षक भरती प्रक्रियेला न्यायालयीन वाद, प्रशासकीय अडथळे आणि रिक्त पदांच्या वाढत्या संख्येमुळे मोठा विलंब झाला होता. त्यामुळे राज्यभरातील हजारो पात्र उमेदवार दीर्घकाळ नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते.
अशा परिस्थितीत एकाच टप्प्यात 30 हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती सुरू होणे हा शिक्षण विभागासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. मात्र, भरतीची घोषणा करणे ही केवळ सुरुवात असून, गुणवत्तायादी वेळेत जाहीर करणे, पसंतीक्रमानुसार पारदर्शक नियुक्त्या करणे, न्यायालयीन व प्रशासकीय अडथळे टाळणे आणि निवड झालेल्या उमेदवारांना तातडीने नियुक्ती आदेश देणे ही सरकारसमोरील पुढील मोठी जबाबदारी असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.