
Villagers Oppose Land Survey in Purandar : पुरंदर येथील विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाला सात गावांनी विरोध दर्शवला आहे. या गावातील शेतकऱ्यांचा विरोध असताना देखील आज(शनिवार) प्रशासनाकडून विमानतळाच्या जागेचे ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाला स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला यावेळी पोलिसांकडून देखील लाठीचार्ज करण्यात आला. तर या लाठीचार्ज मध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, मुंजवडी,उदाचीवाडी, एखतपूर, कुंभारवळण, खानवडी आणि पारगाव या 7 गावांमधील 2 हजार 673हेक्टर इतके भूसंपादन पुरंदर विमानतळासाठी करण्यात येणार आहे. या भूसंपादनाला सात गावांतील शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे.
सात गावांत होणाऱ्या भूसंपादनापैकी एखतपूर या गावातील शुक्रवारी जमिनींच्या संपादनासाठीचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. मात्र यावेळी शेतकऱ्यांनी या सर्वेक्षणाला विरोध करत ड्रोन देखील फोडल्याचं समोर आलं आहे. यानंतर संबंधित शेतकऱ्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाच सांगितलं जात आहे.
दरम्यान काल प्रशासनाविरोधात ग्रामस्थ आणि शेतकरी आक्रमक झाल्यानंतर देखील आज प्रशासनाकडून सर्वेक्षणाचे काम सुरूच ठेवण्यात आलं. सर्वेक्षणाला होणारा विरोध पाहता मोठ्या प्रमाणात फौज फाटा देखील यास सर्वेक्षणाच्या कामाच्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. सर्वेक्षणासाठी आलेल्या पथकाला ग्रामस्थांनी गावांमध्ये येण्यास मज्जाव केला, तसेच सर्वेक्षण करण्यासाठी अडवणूक केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. तसेच या पोलिसांसोबत झालेल्या झटपटी मध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे. अंजनाबाई कामठे असं या वृद्ध महिलेचे नाव असल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदार संघातील पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथे झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. शासनाने नागरिकांच्या भावना समजून घेऊन योग्य ती पावलं उचलणं आवश्यक होते.
तसेच, ''परंतु तेथे बळाचा वापर करण्यात आला ही बाब निश्चितच अतिशय दुःखद आहे. या घटनेत येथील नागरीक जखमी झाले ही बाब अतिशय वेदनादायी आणि अस्वस्थ करणारी आहे. शासनाने जनतेच्या भावना लक्षात घेऊन संयम व संवेदनशीलता दाखविणे आवश्यक होते. आम्ही सर्वजण या घटनेचा निषेध करतो. शासनाला आवाहन आहे की कृपया आपण हा विषय संवेदनशीलतेने हाताळावा.'' असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.