
Pune News : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता पुणे शहरातील अतिक्रमण,अवैध उत्खनन प्रकरणी अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी याप्रकरणी पुढील तीन दिवसांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बुधवारी (ता.28) अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.
पुणे शहरात कात्रज,कोंढवा,येवलेवाडी याठिकाणी अनधिकृत प्लॉटींग करुन ते विकणे तसेच अवैध उत्खनन केले जात आहेत. तसेच जी अतिक्रमणे काढण्यात आली पण ती पूर्णपणे काढण्यात आली नसल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे,असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
महसूलमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक पार पडली. या बैठकीवेळी भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बावनकुळेंनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं.
मंत्री बावनकुळे म्हणाले, पुण्यातील (Pune) कात्रज,कोंढवा,येवलेवाडी येथील अनधिकृत अतिक्रमणे काढण्यात आली पण ती पूर्णपणे काढण्यात आली नाहीत. विधान परिषदेत आश्वासन दिल्यानंतर त्याची कार्यवाही करण्यात अधिकाऱ्यांनी चालढकल करु नये.
अतिक्रमण करणाऱ्यांना केवळ नोटीस देऊन चालणार नाही.दंड भरुन घेतला म्हणजे सर्व काही झाले असे नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील अशी भूमिकाही त्यांनी घेतली. पुणे शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम केले जात आहे. याविरोधात नागरिकांकडून कठोर कारवाई करण्याची मागणी वारंंवार होत असते.
तसेच या ठिकाणी अवैध उत्खनन करणाऱ्यांवर देखील तीन दिवसात गुन्हे दाखल करण्यात यावेत असे आदेशही त्यांनी दिले. याचदरम्यान,त्यांनी कात्रज,कोंढवा, येवलेवाडी येथील अतिक्रमणे आणि बेकायदेशीर अतिक्रमित प्लॉटिंगबाबत त्या विभागातील अधिकारी, तहसिलदार आणि महानगरपालिका आयुक्त यांना जबाबदार धरण्यात येईल असा इशाराही बावनकुळेंनी या बैठकीत दिला. त्यामुळे पुढील तीन दिवसात कारवाई करुन याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
एकीकडे पुण्यातील प्रत्येक राजकीय,प्रशासकीय अशा सर्वच पातळीवरच्या घडामोडींवर उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचं बारीक लक्ष असतं. पण आता अजितदादा पालकमंत्री असलेल्या पुण्यातील अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम आणि अवैध उत्खनन प्रकरणी भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष घातल्यानं महायुतीतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.