Rohit Pawar News: पुणे शहरातील स्वारगटे बसस्थानकातील शिवशाही एसटीमध्ये आज (बुधवारी) तरुणीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अत्याचार करणाऱ्याची ओळख पोलिसांनी पटवली असून त्याच्या शोधासाठी आठ पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, तरुणीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारला शक्ती कायद्याची आठवण करून दिली आहे.
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'संबंधित घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्याबरोबरच राज्यभरात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून राज्य सरकारकडून कठोर उपाययोजना केल्या जाव्यात. इतकेच नाही तर महिला सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा असणारा शक्ती कायदा राज्यात लागू करण्याबाबत तत्काळ निर्णय होईल, ही अपेक्षा!'
'पुण्यात स्वारगेट बस स्थानकात पहाटेच्या सुमारास बसमध्ये मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्देवी घटना समोर आली. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते स्वारगेट बसस्थानक राज्यातील प्रमुख बस स्थानकांपैकी एक असून समोरच पोलीस स्थानकही आहे. तरी एका सराईत गुन्हेगाराकडून बिनदिक्कत अत्याचार करण्यात आल्याने सार्वजनिक स्थळांवरील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.', असे देखील रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
स्वारगेट एसटी बसस्थानकातील एसटीबसमध्येच अत्याचाराची घटना झाल्याने त्याची गंभीर दखल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. सरनाईक यांनी घटना घडली त्यावेळी एसटी स्थानकात ड्यूटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची देखील चौकशी करण्याच्या सूचना दिल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत तरुणी स्वारगेट स्थानकात फलटणला जाण्यासाठी आली होती. मात्र, तिथे थांबलेल्या एक जणाने फलटणाला जाणारी बस दुसरीकडे थांबली असल्याचे सांगितले. बस दाखवण्याच्या बहाण्याने आरोपीने तरुणीला बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये चढवले. तसेच तोही बसमध्ये घुसत त्याने तरुणीवर अत्याचार केला.
पीडित तरुणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासत आरोपीची ओळख पटवली आहे. आरोपीचे नाव दत्तात्रय गाडे असून तो शिरूर गावचा आहे. त्यांच्या तपासासाठी आठ पथके रवाना करण्यात आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, आरोपीचा सीडीआर, तसेच सर्व माहिती गोळा करण्यात आली असून त्याला एक दोन दिवसांत अटक होईल, असे सांगितले.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.