Pimpri-Chinchwad News : भारताची चांद्रयान-3 मोहीम नुकतीच (ता.२३) यशस्वी झाली. चंद्रांच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. हिमालयाच्या शिखरापेक्षा उंच असे हे यश मिळविण्यात पुणे जिल्ह्यातील काही कंपन्या तथा संस्थांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तशीच ती पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेत व दहावीपर्यंत मराठी माध्यमात शिक्षण घेतलेल्या संदेश भालेराव या तरुणाने केली आहे.
चांद्रयान मोहिमेच्या यशात संदेशचा खारीचा वाटा आहे. तर, त्याच्या शैक्षणिक जडणघडणीत पिंपरी-चिंचवडचे (Pimpri-Chinchwad) मोठे योगदान आहे. कारण त्याचे मेकॅनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण हे उद्योगनगरीतील कॉलेजमध्ये झाले. तेथेच शेवटच्या वर्षात असताना त्याची `इस्त्रो`त निवड झाली. त्यामुळे चांद्रयान तीनच्या यशात पिंपरी-चिंचवडसह संदेशच्या कळंब (ता. आंबेगाव, जि. पुणे) या मूळगावाचाही सिंहाचा वाटा आहे. कारण त्याच्या शिक्षणाचा पाया त्याच गावात रोवला गेला.
भारताचे जे यान चंद्रावर उतरले, ते ज्या रॉकेटमधून सोडण्यात आले, ते तयार करण्यात संदेशचा खारीचा वाटा आहे. त्रिवेंद्रम येथे हे रॉकेट बनविण्यात आले. तेथे संदेश काम करीत आहे. रॉकेटच्या बाह्यभाग तयार करण्यात सहभागी झालो होतो, असे त्याने त्रिवेंद्रम येथून 'सरकारनामा' शी बोलताना सांगितले. शिंदे शिवसेनेचे (Shivsena) भोसरी विधानसभा प्रमुख प्रा. दत्ता भालेराव हे त्याचे चुलतबंधू आहेत. चार वर्षे पिंपरी-चिंचवडमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असताना संदेश हा भालेराव सरांकडे काही दिवस राहिला होता.
संदेशच्या या देशाच्या सर्वोच्च कामगिरीतील सहभागाबद्दल शिवसेना (शिंदे) उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी त्याचे फोनवरून अभिनंदन केले. तो कळंब (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील शेतकरी कुटुंबातील असून त्याचे वडील पोपट भालेराव हे शेती करतात. चांद्रयान -तीनच्या यशानंतर संदेश भालेराव आणि कळंब गावच्या भालेराव कुटुंबीयांवर आंबेगाव तालुक्यातूनच नव्हे, तर पुणे जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एकत्र कुटुंब असलेल्या भालेराव परिवारातील अनेकजण उच्चशिक्षित असून व्यवसायातही काहीजण आघाडीवर आहेत. संदेशच्या कुटुंबातील किसन भालेराव हे 'डीआरडीओ' मधून वरिष्ठ शास्त्रज्ञ पदावरुन निवृत्त झाले आहेत.
संदेशचे प्राथमिक शिक्षण कळंब जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, तर माध्यमिकचे कमलजादेवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये झाले. शाळेत तो हुषार होता. अकरावी, बारावीपर्यंत तो महात्मा गांधी विद्यालय, मंचर येथे होता. मेकॅनिकल इंजिनियरसाठी तो २००६ ला पिंपरी-चिंचवडमध्ये आला. २००९ मध्ये जीईटी (गेट) परीक्षा दिल्यानंतर 'इस्रोम'ध्ये त्याची निवड झाली. तेथे काम करतानाही त्याने उच्च शिक्षण घेणे सुरुच ठेवले. आयआयटी मुंबईतून एम. टेक. केले. सध्या तो 'इस्रो'च्या मेकॅनिकल विभागात वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.