Pimpri Chinchwad News : लोकसभेच्या तिसऱ्या टप्यातील मतदानानंतर प्रचाराच्या तोफा आता चौथ्या टप्यासाठी धडाडणार आहेत. या टप्यात 13 मे रोजी मतदान होत असून त्यात मावळ मतदारसंघाचा शेवटच्या टप्यातील प्रचार आता शिगेला पोचला आहे. तेथील आघाडीचे (ठाकरे शिवसेना) उमेदवार संजोग वाघेरे (Sanjog Waghere) पाटील यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ उद्या (दि. 8) पिंपरी-चिंचवडमध्ये धडाडणार आहे.
मावळमधील चिंचवडचे आमदार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्या बालेकिल्यात सांगवीमध्ये आघाडीची ही सभा होत आहे. या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून म्हणजे 2009 पासून पिंपळे गुरव येथील एकाच जगताप कुटुंबातील व्यक्तीने तेथील आमदारपद भुषविलेले आहे. दिवंगत लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) हे 2009 ला तेथून पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 2014 आणि 2019 ला तेच भाजपचे (BJP) आमदार राहिले. 3 जानेवारी 2023 मध्ये त्यांचे अकाली निधन झाल्याने तेथे 26 फेब्रुवारी 2023 ला पोटनिवडणूक झाली. त्यात त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप या निवडून आल्या आहेत.
सांगवीतील उद्याच्या सभेला शरद पवारही येणार होते. पण, त्यांनी 22 दिवसांत तब्बल 52 प्रचार सभा घेतल्याने त्यांना परवा अस्वस्थ वाटू लागले. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. मात्र, दोन दिवसांतच त्यांनी पुन्हा सभांचा धडाका सुरु केला आहे. मात्र, दोन दिवसांच्या या गॅपमुळे सांगवीच्या उद्याच्या सभेसाठी त्यांनी दिलेली वेळ पुढच्या सभा शेड्यूल असल्यामुळे रद्द करावी लागली. त्यामुळे उद्या ते नगर आणि शिरुर मतदारसंघातील नियोजित जाहीर सभा घेणार आहेत. तर, परवा बीड आणि शुक्रवारी त्यांची तोफ पुन्हा शिरुरमध्ये चाकण येथे धडाडणार आहे.
सांगवीच्या सभेत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार चंद्रकांत हंडोरे, शेकापचे सरचिटणीस तथा विधान परिषद सदस्य आमदार जयंत पाटील, ठाकरे शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आणि आमदार सचिन अहिर, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांचीही भाषणे होणार आहेत. ठाकरेंसह आघाडीच्या इतर नेत्यांची अशी ही पहिलीच सभा उद्योगनगरीत होत आहे. तीच प्रचाराची सांगता सभा ठरणार आहे. पण, त्यानिमित्त आघाडीचे बडे नेते प्रथमच शहरात येत आहेत. पवारही लोकसभा प्रचारासाठी पिंपरी-चिंचवडला प्रथमच येणार होते.
दरम्यान, मावळमधील वाघेरेंचे प्रतिस्पर्धी श्रीरंग बारणेंसह (Shrirang Barne) पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या चारही उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पुण्यात झाली. त्यामुळे आता ती मावळसाठी स्वतंत्र अशी होणार नाही.आता तेथे प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहरात येणार आहेत. तर उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस हे त्यासाठी कालच (ता.६) चिंचवडला येऊन गेले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.