केडगाव (जि. पुणे) : मुलाच्या अपघाती मृत्यूस आपला चुलत भाऊ आणि त्याचा मुलगाच जबाबदार आहे, अशी मनाशी खूणगाठ बांधून मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पाच सख्खा भांवडांनी सात जणांची हत्या (Murder) केल्याचे पोलिस तपास उघड झाले आहे. दौंड (Daund) तालुक्यातील भीमा नदी पात्रात मृतदेह आढळलेल्या सात जणांनी आत्महत्या केली नाही, तर त्यांच्याच नातेवाईकांनी थंड डोक्याने हे हत्याकांड घडविल्याचे पुढे आले आहे. (Seven people were killed to avenge the death of the child)
पुणे (Pune) जिल्हा (ग्रामीण) पोलिस (Police) अधीक्षक अंकित गोयल यांनी बुधवारी (ता. २५ जानेवारी) यवत (ता. दौंड, जि. पुणे) येथे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. पोलिसांनी अशोक कल्याण पवार (वय ६९), श्याम कल्याण पवार (वय ३५), शंकर कल्याण पवार (वय ३७) प्रकाश कल्याण पवार (वय २४), या आरोपींची बहीण कांताबाई सर्जेराव जाधव ( वय ४५, सर्व रा. ढवळेमळा, निघोज, ता. पारनेर, जि. नगर) यांना अटक केली आहे. ही सर्व सख्खी भावंडं आहेत.
दरम्यान, पारगाव येथे भीमा नदी पात्रात १८ जानेवारीपासून २४ जानेवारीपर्यंत सात मृतदेह आढळले होते. त्यात मोहन उत्तम पवार (वय ४५) संगीता ऊर्फ शहाबाई मोहन पवार (वय ४०, दोघेही रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड), शाम पंडीत फुलवरे (वय २८), राणी शाम फुलवरे (वय २४) रितेश उर्फ भैय्या शाम फुलवरे (वय ७), छोटू शाम फुलवरे (वय ५), कृष्णा शाम फुलवरे (वय ३, चौघेही रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) यांचा समावेश आहे. मोहन पवार हे शाम फुलवरे यांचे सासरे आहेत. तसेच, अशोक पवार आणि मोहन पवार हे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत.
मृतांवर यवत येथे मंगळवारी (ता. २४ जानेवारी) रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. आरोपी व मयत सर्वजण निघोज (ता. पारनेर) येथे राहत होते. तेथे ते मजुरी काम करत असत. एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळल्याने दौंड तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांची पाच पथके तैनात करण्यात आली होती. काही पुराव्यांच्या आधारे ही आत्महत्या नसून खून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी विविध ठिकाणांवरून आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, वाघोली येथे काही महिन्यांपूर्वी आरोपी अशोक पवार याचा मुलगा धनंजय पवार याचा अपघातात मृत्यू झाला होता. चुलत भाऊ मोहन पवार आणि त्याचा मुलगा अनिल पवार हेच आपल्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत आहेत, असे आरोपींच्या डोक्यात बसले होते. मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठीच आरोपींनी मोहन पवार व त्यांच्या कुटुंबीयांचा खून केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. यातील चौघांचा गळा आवळून खून केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. यात आणखी कोणी सामील आहे का, कट कसा रचला, कुठे रचला याबाबतचा तपास पोलिस करीत आहेत, अशी माहिती गोयल यांनी दिली.
या वेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलिस निरीक्षक अविनाश शिळिमकर आदी उपस्थित होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व यवत पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस पुढील तपास करीत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.